१२९. मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर!
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर!! ॥धृ.॥
मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा!
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावरल्या रे लाटा!! ॥१॥
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादनं!! ॥२॥
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात!! ॥३॥
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर!
आरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर!! ॥४॥
मन चपय चपय
त्याले नही जरा धीर!
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर!! ॥५॥
मन एवढं एवढं
जसा खाकसंचा दाना!
मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना!! ॥६॥
देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत!! ॥७॥
देवा, आसं कसं मन?
आसं कसं रे घडलं!
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं!!! ॥८॥
गीत : संत बहिणाबाई
संगीत : वसंत पवार
स्वर : आशा भोसले
चित्रपट : मानिनी [१९६१]
ekadam mast kavita aahe . eka adani streene lihileli kavita sarvana vichar karanyas pravruta karate.
ReplyDelete