Monday, March 26, 2007

९०. ससा तो ससा की कापूस जसा

९०. ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली ॥धृ.॥

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहीयले
वाटेत थांबलेला कोणाशी बोललेना
चालले लुटुलुटु पाऽऽऽही ससा ॥१॥

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोऽऽऽपे ससा ॥२॥

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
निजला तो संपला सांऽऽऽगे ससा ॥३॥

गीतकार : शांताराम नांदगावकर
संगीतकार : अरूण पौडवाल
गायक : उषा मंगेशकर

८९. विसरशील खास मला दृष्टिआड होता

८९. विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता ॥धृ.॥

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायहि विविध, विविध विषय भोवताली
गुंतता तयांत कुठे, वचन आठवीता ॥१॥

स्वैर तू विहंग, अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा ॥२॥

अंतरिची आग तुला जाणवु कशाने
बोलवे न वेदनाच वचन दु:ख नेणे
याकरता दॄष्टिआड होउ नको नाथा ॥३॥

गीतकार : ज. के. उपाध्ये
संगीतकार : यशवंत देव
गायक : आशा भोसले

८८. समाधि साधन संजीवन नाम ।

८८. समाधि साधन संजीवन नाम ।
शांति दया, सम सर्वाभूतीं ॥धृ.॥

शांतीची पैं शांति निवृती दातारू ।
हरिनाम उच्चारू दिधला तेणें ॥३॥

यम-दम-कळा, विज्ञानेंसी ज्ञान ।
परतोनि अज्ञान न ये घरा ॥२॥

ज्ञानदेवा सिद्धी-साधन अवीट ।
भक्ति-मार्ग नीट हरि-पंथीं ॥३॥

गीतकार : संत ज्ञानेश्वर
संगीतकार : मधुकर गोळवलकर
गायक : सुधीर फडके