Friday, September 14, 2007

१९७. दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही

१९७. दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही
नाव आहे चाललेली, कालही अन्‌ आजही ॥धृ.॥

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा
मी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा ॥१॥

याद नाही, साद नाही ना सखी ना सोबती
नाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती ॥२॥

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली दूरची हाले हवा ॥३॥

एकला मी नाही जैसा, नाही नाही मी दुणा
जीवनाला ऐल नाही पैल तैसा मध्य ना ॥४॥

गीत : आरती प्रभू
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर

१९६. दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले

१९६. दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले
प्रगटता अवनितलि कोण त्या लोपवी ॥धृ.॥

शौर्यसागर-लहरि गगन-मंडळ महा
भेदिता कवण त्या अबल कर थोपवी ? ॥१॥

गीत : वीर वामनराव जोशी
संगीत : वझेबुवा
स्वर : दिनानाथ मंगेशकर
नाटक : रणदुंदुभि (१९२७)

१९५. समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते;

१९५. समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते;
केसातच फुललेली जाई पायांशी पडते. ॥धृ.॥

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे;
मागे मागे राहिलेले माझे माहेरे बापुडे. ॥१॥

साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची;
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. ॥२॥

थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन ग ये. ॥३॥

हसशील, हास मला, मला हसूही सोसेना;
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा ! ॥४॥

गीत : आरती प्रभू
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले

१९४. वेगवेगळी फुले उमलली, रचुनि त्यांचे झेले

१९४. वेगवेगळी फुले उमलली, रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले, गेले ! ते दिन गेले ॥धृ.॥

कदंब-तरूला बांधुनि दोला, उंच-खालती झोले
परस्परांनी दिले-घेतले, गेले ! ते दिन गेले

हरीत बिलोरी वेलबुटीवरि, शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनी किती झोकले, गेले ! ते दिन गेले

निर्मलभावे नव देखावे, भरुनी दोन्ही डोळे
तू मी मिळुनी रोज पाहिले, गेले ! ते दिन गेले

गीत : भवानी शंकर पंडित
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : पं. हृदयनाथ मंगेशकर

१९३. गणराज रंगि नाचतो, नाचतो,

१९३. गणराज रंगि नाचतो, नाचतो,
पायि घागऱ्या करिती रुणुझुणु
नाद स्वर्गि पोचतो ॥धृ.॥

कटि पीतांबर कसुन भर्जरी
बाल गजानन नर्तनासि करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो ॥१॥

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रम्हा धरितो तालहि रंगुन
मृदंग धिमि वाजतो ॥२॥

देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदशिव
शिशुकौतुक पाहतो ॥३॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर

१९२. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

१९२. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! ॥धृ.॥

सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया ॥१॥

गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया ॥२॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर

१९१. वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा

१९१. वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा
घर पान्यामंदी बंदराला करतो ये जा ! ॥धृ.॥

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वाऱ्यानं घेतंय झेपा
नथ नाकात साजीरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलिवाऱ्याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय्‌ मौजा ॥१॥

या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा
कवा उदानवारा शिराला येतंय्‌ फारू
कवा पान्यासुनी आबाला भिरतंय तारू
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येतंय्‌ भरती
जाते पान्यानं भिजून धरती
येतंय भेटाया तसाच भरतार माजा ॥२॥

भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतं दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी, रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरतो डाली
रात पुनवेचं चांदनं प्याली
कशि चांदीची मासली झाली
माज्या जाल्यात व्होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा ॥३॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर, हेमंत कुमार

१९०. मर्मबंधातली ठेव ही, प्रेममय

१९०. मर्मबंधातली ठेव ही, प्रेममय
ठेवी जपोनी, सुखानें दुखविं जीव ॥धृ.॥

हृदयांबुजी लीन लोभी अली हा
मकरंद ठेवा लुटण्यासि आला
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥१॥

गीत : एस बी शास्त्री
संगीत : माहित नाही
स्वर : मास्टर दिनानाथ मंगेशकर
नाटक : सन्यस्त खड्‌ग

१८९. मानसीचा चित्रकार तो

१८९. मानसीचा चित्रकार तो
तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो ॥धृ.॥

भेट पहिली अपुली घडता
निळी मोहिनी नयनी हसता
उडे पापणी किंचित ढळता
गोड कपोली रंग उषेचे, रंग उषेचे भरतो ॥१॥

मम स्पर्शाने तुझी मुग्धता
होत बोलकी तुला नकळता
माझ्याविण ही तुझी चारुता
मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो ॥२॥

तुझ्यापरि तव प्रीतीसरिता
संगम देखून मागे फिरता
हसरी संध्या रजनी होता
नक्षत्रांचा नीळा चांदवा, नीळा चांदवा झरतो ॥३॥


गीत : पी. सावळाराम
संगीत : वसंत प्रभू
स्वर : पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट : कन्यादान (१९६०)