Wednesday, September 5, 2007

१८८. गोमू माहेरला जाते हो नाखवा

१८८. गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा ॥धृ.॥

दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा ॥१॥

कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा ॥२॥

सोडून दे रे खोड्या साऱ्या
शिडात शिर रे अवखळ वाऱ्या
झणी धरणीला गलबत टेकवा ॥३॥

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : दत्ता डावजेकर
स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
चित्रपट : वैशाख वणवा (१९६४)

१८७. जाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले

१८७. जाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले ॥धृ.॥

चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली
काजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली
मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले ॥१॥

सौख्य माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या भावना
मोर स्वप्नांचे निळे अन्‌ विंधणाऱ्या वेदना
मी असे गीतांतुनी सर्वस्व माझे वाहिले ॥२॥

संपता पूजा स्वरांची हात तू देशील का ?
दाटुनी काळोख येता तू घरी नेशील का ?
पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले ॥३॥

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : लता मंगेशकर

१८६. हिरव्या हिरव्या रंगाची, झाडि घनदाट

१८६. हिरव्या हिरव्या रंगाची, झाडि घनदाट
सांग्‌ गो चेड्‌वा दिस्तां कसो, खंडळ्याचो घाट

हिरव्याहिरव्या झाडीत हिरवीहिरवी पानां,
हिरव्याहिरव्या पानांत वारो गाता गानां
पुना-बाँबे हीच गो तुझ्या, सासरची वाट

खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार,
थंडिमधे लालि चढे गालि गुलजार
तोऱ्यामध्ये होऊ नको, उगी अशी ताठ

बोगद्यात गाडी जाता होई अंधार,
अंधारात प्रीत घेता प्रीतिचो आधार
इंजिनाच्या मागे जाती, डबे मागोमाग

गीत : रमेश अणावकर
संगीत : सूरज
स्वर : जयवंत कुलकर्णी व इतर

१८५. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे

१८५. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे
पापणिच्या पंखांत झोपु दे डोळ्यांची पाखरे ॥धृ.॥

झोपी गेल्या चिमण्या राघू
चिमण्या राजा, नकोस जागू
हिरव्या पानांवरी झोपली वेलींची लेकरे ॥१॥

पुरे खेळणे आता बाळा
थांबव चाळा, थांबव वाळा
शब्द ऐकते झोपेमधुनी, चाळवते वारे ॥२॥

मेघ पांढरे उशास घेउनि
चंद्र-तारका निजल्या गगनी
वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे ॥३॥

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत :वसंत पवार
स्वर :आशा भोसले
चित्रपट :बाळा जो जो रे (१९५१)