Wednesday, October 31, 2007

२१०. उगवला चंद्र पुनवेचा !

२१०. उगवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयी दरिया ! उसळला प्रीतिचा ! ॥धृ.॥

दाहि दिशा कशा खुलल्या,
वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या !
प्रणयरस हा चहुकडे ! वितळला स्वर्गिचा ? ॥१॥

गीत : प्रल्हाद केशव अत्रे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : बकुळ पंडित
नाटक : पाणिग्रहण (१९४६)

२०९. उठा उठा चिऊताई

२०९. उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे कसे मिटलेले
अजूनही अजूनही ! ॥धृ.॥

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ! ॥२॥

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ! ॥२॥

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ! ॥३॥

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिआ दूर जाई
भूर भूर भूर भूर ! ॥४॥

गीत : कुसुमाग्रज
संगीत : कमलाकर भागवत
स्वर : सुमन कल्याणपूर

२०८. मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला ॥धृ.॥

२०८. मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला ॥धृ.॥

नका विचारू स्वारि कशी ?
दिसे कशी, अन्‌ हासे कशी ?
कसं पाडलं मला फशी ?
कशी जाहले राजिखुशी ?
नजीक येता मुहूर्तवेळा ॥१॥

नका विचारू गमतीजमती
काय बोललो पहिल्या भेटी ?
कसे रंगले स्वप्न पहाटी ?
कशी रंगली लाली ओठी ?
कसा जाहला जीव खुळा ? ॥२॥

अर्थ उलगडे समरसतेचा
सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा
धुंद बने बुल्बूल जिवाचा
घरी यायची झाली वेळा ॥३॥

गीत : मनमोहन नातू
संगीत : गजाननराव वाटवे
स्वर : सरोज वेलिंगकर

२०७. पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची

२०७. पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू आशी घडे ही या दोन लोचनांची ॥धृ.॥

पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न रहिले मी, किमया अशी कुणाची ? ॥१॥

डोळे मिटून घेता दिसतोस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन्‌ नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याहि भावनांची ॥२॥

लाजून वाजती या अंगातुनी सतारी
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्ने ही मीलनाची ॥३॥

वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यांत वाचतो अन्‌ या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची ॥४॥

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : सुमन कल्याणपूर, अरुण दाते

२०६.जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !

२०६.जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे ! ॥धृ.॥

किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे ॥१॥

गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे ॥२॥

निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी ?
तूच एकला नाथ अनाथा महिमा तव गाजे ॥३॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले