Friday, June 8, 2007

९४. सजल नयन नित धार बरसती

९४. सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जली मिसळती ।। धृ. ।।

वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यही सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती ।।१।।

चंद्र चांदणे सरले आता
नीरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतील अमृतधारा
तुझ्याविना विषधारा होती ।। २ ।।

थकले पैंजण चरणही थकले
वृंदावनीचे मोहन सरले
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजून उखाणे मला घालिती ।। ३।।

गीत : शांताराम नांदगावकर
गायक: अजित कडकडे
संगीत: अशोक पत्की

ह्या ब्लॉगसाठी ही कविता धनंजय फडके यांनी पाठवली आहे.

Thursday, June 7, 2007

९३. विसर प्रीत, विसर गीत, विसर प्रीत आपुली

९३. विसर प्रीत, विसर गीत, विसर प्रीत आपुली
यापुढे न चांदरात, यापुढे न सावली ॥ धृ.॥

कंठ दाटतो असा, शब्दही मुळी न फुटे
काळजात एक एक, तंतूही तसाच तुटे
मीच मांडिल्या घरांत शून्यता विसावली ।। १ ।।

शब्द तू दिलास एक राहिलो विसंबूनी
वंचिलेस गे, अखेर तूच शपथ मोडूनी
तूं उगाच स्वप्नवेल संशयात जाळिली ।। २ ।।

डोळियांत मी तुझ्या अखेर पाप जाहलो
झेलण्या उरी कलंक एकटाच राहिलो
विश्व मोकळे, मला चिताच लाभली ।। ३ ।।

गायक: सुधीर फडके
संगीत: यशवंत देव
गीत: शांताराम नांदगावकर

ह्या ब्लॉगसाठी ही कविता धनंजय फडके यांनी पाठवली आहे.