Wednesday, December 13, 2006

८७. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्‌

८७. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्‌
वंद्य वंदे मातरम्‌ ॥धृ.॥

माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्‌ ॥१॥

याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले
शस्त्रहीना एक लाभे मंत्र वंदे मातरम्‌ ॥२॥

निर्मीला हा मंत्र ज्यांनी आचारीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत, वंदे मातरम्‌ ॥३॥

गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीतकार : सुधीर फडके
गायक : सुधीर फडके
चित्रपट : वंदे मातरम्‌ (१९४८)

८६. वद जाऊ कुणाला शरण करी जो हरण संकटाचे ।

८६. वद जाऊ कुणाला शरण करी जो हरण संकटाचे ।
मी धरिन चरण त्याचे । अगं सखये ॥धृ.॥

बहु आप्त बंधु बांधवां प्रार्थिले कथुनि दुख: मनिंचे ।
तें होय विफल साचें । अगं सखये ॥१॥

मम तात जननी मात्र तीं बघुनी कष्टती हाक ईचे ।
न चलेचि कांहिं त्यांचें । अगं सखये ॥२॥

जे कर जोडुनी मजपुढें नाचले थवे यादवांचे
प्रतिकूल होति साचे । अगं सखये ॥३॥

गीतकार : अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीतकार : अण्णासाहेब किर्लोस्कर
गायक : बालगंधर्व
नाटक : संगीत सौभद्र (१८८२)

८५. वाटेवर काटे वेचीत चाललो

८५. वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो ॥धृ.॥

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो ॥१॥

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऎकीत साद
नादातच शीळ वाजवित चाललो ॥२॥

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो ॥३॥

खांद्यावर बाळगिले, ओझे सुखदुखा:चे
फेकुन देऊन अता परत चाललो ॥४॥

गीतकार : कवी अनिल
संगीतकार : यशवंत देव
गायक : पं. वसंतराव देशपांडे.

८४. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार

८४. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥धृ.॥

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥१॥

घटा घटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ॥२॥

तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडीसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥३॥

गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :सुधीर फडके
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :प्रपंच - (१९६१)

८३. विसरु नको श्रीरामा मला

८३. विसरु नको श्रीरामा मला
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया ॥धृ.॥

किती जन्म झाले, तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले, घेऊनी हिंडले सतीचा वसा, प्रिया ॥१॥

तू सांब भोळा, उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते आपुले वेगळे, जुळे श्यामला, प्रिया ॥२॥

गीतकार :सुधीर मोघे
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट :जानकी

८२. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम

८२. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम
विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम ॥धृ.॥

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरी नाम ॥१॥

बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा
हाच तुक्याचा विठठल आणि दासाचा श्रीराम ॥२॥

जितुके मालक, तितकी नावे, हृदये जितकी याची गावे
कुणी न ओळखी तरीही याला, दिन अनाथ अनाम ॥३॥

गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :आशा भोसले, सुधीर फडके
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :जगाच्या पाठीवर (१९६०)

८१. वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे

८१. वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल पाने ॥धृ.॥

रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्न लोचनी वाटते हवे
हा निसर्ग भासे, विश्वरुप लेणे ॥१॥

या निळया नभी, मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
झेलते पिसावरी, हे सतेज सोने ॥२॥

आज वेड हे कुणी लाविले ?
अंतराळी का पडती पाऊले ?
कशी सोडवू मी सुखाचे उखाणे ? ॥३॥

गीतकार :जगदीश खेबुडकर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट :संसार (१९८०)

८०. वादल वारं सुटल गं, वार्‍यानं तुफान उठलं गं

८०. वादल वारं सुटल गं, वार्‍यानं तुफान उठलं गं
भिरिभर वार्‍यांत, पावसाच्या मार्‍यात, सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादल वारं सुटलं गं ॥धृ.॥

गडगड ढगांत बिजली करी
फडफड शिडात, धडधड उरी
एकली मी आज घरी बाय
संगतीला माझ्या कुनी नाय
सळसळ माडांत, खोपीच्या कुडांत
जागणार्‍या डोल्यांत सपान मिटलं ॥१॥

सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ
कमरेत जरा वाकूनिया
पान्यामंदी जालं फेकूनिया
नाखवा माझा, दर्याचा राजा
लाखाचं धन यानं जाल्यांत लुटलं ॥२॥

गीतकार :शांता शेळके
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

७९. वाट इथे स्वप्नातील संपली जणू

७९. वाट इथे स्वप्नातील संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू ॥धृ.॥

आजूबाजूच्या पानांनी वेढली ही निळाई
चिंतनात बैसली ग मंत्रमुग्ध राई
फुलुनिया आली गडे बावरी तनू ॥१॥

दर्‍यांतूनी आनंदला, पाणओघ नाचरा
आसमंत भारीतो गं गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले गं इंद्राचे धनू ॥२॥

गीतकार : अशोक परांजपे
संगीतकार : अशोक पत्की
गायक : सुमन कल्याणपूर

७८. दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे

७८. दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची, शपथ तुला आहे ॥धृ.॥

बकुळीच्या झाडाखाली, निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली, सुगंधी क्षणांत
त्या सगळया बकुळ फुलांची, शपथ तुला आहे ॥१॥

शुभ्रफुले वेचित रचिला, चांद तू जुईचा
म्हणालीस, चंद्रोत्सव हा सावळया भुईचा
फुलातल्या त्या चंद्राची, शपथ तुला आहे ॥२॥

भुरभुरता पाऊस होता, सोनिया उन्हात
गवतातून चालत होतो, मोहूनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची, शपथ तुला आहे ॥३॥

हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटूनी येती, असे अंतरंगी
या उदास आभाळाची, शपथ तुला आहे ॥४॥

गायक :अरुण दाते

७७. धूके दाटलेले उदास उदास

७७. धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास ॥धृ.॥

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा
कुणी ही ना इथे दिसे आसपास ॥१॥

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा
कुणा शोधिती या उदासीन लाटा
दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास ॥२॥

क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास ॥३॥

गीतकार :मंगेश पाडगांवकर
गायक :अरुण दाते
संगीतकार :यशवंत देव