Thursday, June 28, 2007

११७. एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख

११७. एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ धृ. ॥

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ १ ॥

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणासी?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ २ ॥

एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाह्ताना, चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक ॥ ३ ॥

गीत : ग. दि. माडगुळकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : आशा भोसले
चित्रपट : सुखाचे सोबती [१९५८]

११६. हे बंध रेशमाचे

११६. पथ जात धर्म किंवा नाते ही ज्या न ठावे,
ते जाणतात एक,प्रेमास प्रेम द्यावे;
हृदयात जागणार्‍या अतिगूढ संभ्रमाचे,
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥१॥

विसरून जाय जेव्हा माणूस माणसाला,
जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाळा,
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमांचे.
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥२॥

क्षण एक पेटणारे हे युद्धवेड आहे
देहाहुनी निराळी रक्तास ओढ आहे
तीर्थाहुनी निराळे पावित्र्य संगमाचे
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥३॥

हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा,
धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा,
बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे.
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥४॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक : हे बंध रेशमाचे [१९६८]

११५. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा

११५. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा ॥धृ.॥

सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान
सा, नि, ध, प, म, ग, रे, सा, रे, ग, म, प
दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा ! ससा म्हणाला, चहा हवा ॥१॥

कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, छान छान ! ससा म्हणाला, काढ पान ॥२॥

कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे
(बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ)
आणि भरभर वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाबास ! ससा म्हणाला, करा पास ॥३॥

गीत : राजा मंगळवेढेकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : शमा खळे

११४. चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावानी

११४. चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावानी ॥धृ.॥

शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी, दिवसातरी मग कोठे निजसी ॥१॥

वारा वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिसी ॥२॥

काठी देखील नसते हाथी, थोडी नाही विश्रांती
चढती कैसी, कशी उतरसी निळ्या डोंगरी अखंड फिरशी ॥३॥

वाडा घरकुल घरटे नाही, आई नाही अंगाई
म्हणूनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी ॥४॥

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : आशा भोसले
चित्रपट : जिव्हाळा [१९६८]

११३. स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा

११३. स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा ॥धृ.॥

रेखाकृती सुखाच्या, चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरुन गेल्या
कधी सोशिला उन्हाळा कधी लाभला विसावा ॥१॥

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजूनी, प्रीती फुलोनी यावी
काट्याविना न हाती, केव्हा गुलाब यावा ॥२॥

सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा ॥३॥

गीत : म. पां. भावे
संगीत : अनिल । अरूण
स्वर : आशा भोसले

११२. हे चांदणे फुलांनी, शिंपीत रात्र आली

११२. हे चांदणे फुलांनी, शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी, ओल्या दवांत न्हाली ॥धृ.॥

तारे निळे नभांत, हे गूज सांगतात
का रंग वेगळा हा, खुलत्या नव्या कळीत
ओठांतल्या स्वरांना, का जाग आज आली ॥१॥

तो स्पर्श चंदनाचा, की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला, स्वप्नातल्या स्वरांचा
ही रात्र धूंद होती, स्वप्नात दंगलेली ॥२॥

वाटे हळूच यावा करपाश या गळ्यात
मैफिल ही सरावी ही धुंद त्या मिठीत
आनंद आगळा हा ही जाग आज आली ॥३॥

गीत : मधुसूदन कालेलकर
संगीत : प्रभाकर जोग
स्वर : अनुराधा पौडवाल
चित्रपट : चांदणे शिंपीत जाशी [१९८२]

१११. माझिया मना जरा थांब ना

१११. माझिया मना जरा थांब ना
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना!!! ॥धृ.॥

माझिया मना, जरा बोल ना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू!
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना!! ॥१॥

माझिया मना, जरा ऐक ना
सांजवेळ ही, तुझे चालणे!
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
उषःकाल आहे नवी कल्पना!! ॥२॥

गीत : सौमित्र
संगीत : श्रीधर फडके
स्वर : आशा भोसले

११०. ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

११०. ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी ॥धृ.॥

त्या कातरवेळा थरथरती अधरी
त्या तिन्ही सांजाच्या आठवणी त्या प्रहरी
कितीदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी ॥१॥

कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मीच्या गाठी ॥२॥

कधि जवळ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधी धुसफ़ुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी ॥३॥

गीत : बाळ कोल्हटकर
संगीत : वसंत देसाई
स्वर : कुमार गंधर्व
नाटक : देव दीनाघरी धावला

१०९. काजल रातीनं ओढून नेला सये साजन माझा

१०९. काजल रातीनं ओढून नेला सये साजन माझा
जीव ये भरुनी भिजते पापनी कधि रे येशिल राजा ॥धृ.॥

पाऊस येडापिसा जिवाला लावून गेला तात
तुफान आलं सुसाट माजा करुन गेला घात
कातरवेळी करनी जाली हरवून गेला राजा ॥१॥

सुकली फुलांची शेज राया राहिला अर्धा डाव
उधळून जाता खेळवाया श्वासांनी तोडिला ठाव
भुकेली ज्वानी जळते आतुनी ये रे ये एकदा राजा ॥२॥

गीत : सुधीर मोघे
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले
चित्रपट : हा खेळ सावल्यांचा [१९७६]

१०८. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली

१०८. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली ॥धृ.॥

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली ॥१॥

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली! ॥२॥


उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली! ॥३॥

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली! ॥४॥

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली ॥५॥

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली? ॥६॥

गीत : सुरेश भट
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले
चित्रपट : निवडुंग [१९८९]

१०७. लवलव करी पात, डोळं नाही थार्‍याला

१०७. लवलव करी पात, डोळं नाही थार्‍याला
एकटक पहावं कसं, लुकलूक तार्‍याला ॥धृ.॥

चवचव गेली सारी, जोर नाही वार्‍याला
सुटं सूटं झालं मन, धरु कसं पार्‍याला ॥१॥

कुणी कुणी नाही आलं, फडफड गं राव्याची
रुणझूण हवा का ही, गाय उभी दाव्याची ॥२॥

तटतट करी चोळी, तुटतुटक गाठीची
उंबर्‍याशी जागी आहे, पारुबाई साठीची ॥३॥

गीतकार :आरती प्रभू
गायक :पद्मजा फेणाणी जोगळेकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट :निवडुंग [१९८९]

१०६. तुझ्याचसाठी रे

१०६. तुझ्याचसाठी रे

तुझ्याचसाठी तुझे घेऊनी नाव
सोडीला कायमचा मी गाव
तुझ्याचसाठी रे...

गावशिवेवर आस थांबली
तुझ्याचसाठी दृष्ट लांबली
अंधारी ही बुडे साऊली
तुच प्रकाशा वाट पुढती दाव
सोडीला कायमचा मी गाव... तुझ्याचसाठी रे

गात गुणांची तुझी आरती
मनात पूजीन तुझीच मूर्ती
संकट येता हाके पुढती
कृष्णापरी तू धाव... सखीला पाव
सोडीला कायमचा मी गाव... तुझ्याचसाठी रे

चित्रपट: पावनखिन्ड (१९५६)
संगीत: वसंत प्रभु
गीत: पी. सावळाराम
निर्मता: जय भवानी चित्र
गायिका: लता मंगेशकर.

१०५. त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?

१०५. त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ? ॥१॥

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ? ॥२॥

जीवनी संजिवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का ? ॥३॥

गीतकार :सूर्यकांत खांडेकर
गायक :पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

१०४. जयदेव जयदेव जय जय शिवराया !

१०४. जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....॥१॥

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......॥२॥

त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........॥३॥

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला

देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........॥४॥

बोला शिवाजी महाराज की ... जय !!

गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

१०३. जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

१०३. जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥

गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर
गायक :लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर
संगीतकार :मधुकर गोळवलकर

Wednesday, June 27, 2007

१०२. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

१०२. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ॥धृ.॥

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...

गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर
गायक :लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

१०१. हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

१०१. हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ॥१॥

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे, भंगले
जाहली राजधान्यांची, जंगले
परदास्य-पराभवि सारी, मंगले
या जगति जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ॥२॥

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ॥३॥

गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

१००. दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही

१००. दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही ॥धृ.॥

भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रुप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई ॥१॥

असा भरुन ये ऊर, जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या, मग भिजूनीया जाई ॥२॥

आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा
कशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ आभाळ दूर पसरुन राही ॥३॥

गायक : अरूण दाते
गीतकार : माहित नाही
संगीत : माहित नाही

Monday, June 25, 2007

९९. शूरा मी वंदिले

९९. शूरा मी वंदिले
धारातिर्थी तप ते आचरती, सेनापती यश याची बले ॥धृ.॥

शिरकमला समरी अर्पती
जनहित पूजन वीरा सुखशांती
राज्य सुखी या साधूमुळे ॥१॥

नाटक : संगीत मानापमान
गायक : पं. दीनानाथ मंगेशकर
गीतकार : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
संगीत : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर