Thursday, June 28, 2007

११६. हे बंध रेशमाचे

११६. पथ जात धर्म किंवा नाते ही ज्या न ठावे,
ते जाणतात एक,प्रेमास प्रेम द्यावे;
हृदयात जागणार्‍या अतिगूढ संभ्रमाचे,
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥१॥

विसरून जाय जेव्हा माणूस माणसाला,
जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाळा,
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमांचे.
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥२॥

क्षण एक पेटणारे हे युद्धवेड आहे
देहाहुनी निराळी रक्तास ओढ आहे
तीर्थाहुनी निराळे पावित्र्य संगमाचे
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥३॥

हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा,
धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा,
बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे.
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥४॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक : हे बंध रेशमाचे [१९६८]

No comments: