Wednesday, June 20, 2007

९८. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग

९८. टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग
देवाजीच्या दारी आज, रंगला अभंग ॥धृ.॥

दरबारी आले, रंक आणि राव
सारे एकरूप, नाही भेदभाव
नाचु गाऊ सारे, होऊनी नि:संग ॥१॥

जनसेवेपायी, काया झिजवावी
घाव सोसूनिया, मने रिझवावी
ताल देऊनि हा, बोलतो मृदंग ॥२॥

ब्रम्हानंदी देह, बुडूनिया जाई
एक एक खांब, वारकरी होई
कैलासाचा नाथ, झाला पांडुरंग ॥३॥

गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीतकार : राम कदम
गायक : पं. वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी
चित्रपट : भोळी भाबडी (१९७२)

Tuesday, June 19, 2007

९७. तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला

९७. तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्यामनी प्रीत तुझी घेते हिंदोळा ॥धृ.॥

गायिलेस डोळयांनी एक निळे गाणे
बट हळवी वार्‍यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला ॥१॥

पवनातूनी शीतलता दाटूनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदी धूंद धूंद झाला ॥२॥

ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात
मिटून पंख खग निवांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला ॥३॥

गीतकार : माहित नाही
संगीतकार : माहित नाही
गायक : सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल

Monday, June 18, 2007

९६. का हो धरिला मजवर राग ?

९६. का हो धरिला मजवर राग ? ॥धृ.॥

शेजा-याचे घरी येता वरचेवरी
तुमचे लाडीक बोल येती कानावरी
आणि जागेपणी येते स्वप्नांना जाग
माझ्या स्वप्नांना जाग, माझ्या स्वप्नांना जाग ॥१॥

वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे
भारी हट्टी स्वभाव, तुम्ही जाता पुढे
जाता चैतापरी माझी फुलवून बाग ॥२॥

जाणे येणे होते तुमचे माझ्या घरी, माझ्या घरी
तुमच्या पावलांनी वाट पडली परसूदारी
वाटतं फिरुन याल अवचित केंव्हा तरी, केंव्हा तरी
खुळ्या प्रीतीचा माग, खुळ्या प्रीतीचा माग ॥३॥

गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीतकार : सुधीर फडके
गायक : आशा भोसले
चित्रपट : जगाच्या पाठीवर (१९६०)