Wednesday, October 10, 2007

२०४. मना तुझें मनोगत मला कधीं कळेल का

२०४. मना तुझें मनोगत मला कधीं कळेल का
तुझ्यापरी गूढ सोपें होणें मला जुळेल का ॥धृ.॥

कोण जाणे केवढा तूं
व्यापतोस आकाशाला
आकाशाचा अर्थ देसी
एका मातीच्या कणाला
तुझें दार माझ्यासाठी थोडेतरी खुलेले का ॥१॥

कळींतला ओला श्वास
पाषाणाचा थंड स्पर्श
तुझ्यामधें सामावला
वारा, काळोख, प्रकाश
तुझें अरुपाचें रूप माझ्यापुढें फुलेल का ॥२॥

कशासाठीं कासाविशी
कुणासाठीं आटापिटी
खुळ्या ध्यास-आभासांचा
पाठलाग कोणासाठीं
तुझ्या मनांतले आर्त माझ्यामनी ढळेल का ॥३॥

गीत : सुधीर मोघे
संगीत : आनंद मोडक
स्वर : आशा भोसले
चित्रपट : कळत नकळत [१९८९]

२०३. तुझे गीत गाण्यासाठी

२०३. तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे ॥धृ.॥

शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाउ दे रे ॥१॥

मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे ॥२॥

शांत शांत उत्तररत्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेउन येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाउ दे रे ॥३॥

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहु दे रे ॥४॥

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
स्वर : सुधीर फडके

२०२. गालावर खळी डोळ्यात धुंदी

२०२. गालावर खळी डोळ्यात धुंदी ॥धृ.॥

ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका इशार्‍याची
जाऊ नको दुर तू
अशी ये समोर तू
माझा रंग तू घे
तुझा रंग मला दे
गालावर खळी…. रंग मला दे ॥१॥

हो कोणता हा मोसम मस्त रंगांचा
तुझ्या सवे माझ्या जीवनी आला
सूने सूने होते किती मन माझे
आज तेच वाटे धुंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खरे
तुझ्यासाठी जीव झुरे
मन माझे थरारे
कधी तुझ्या पुढे पुढे
कधी तुझ्या मागे मागे
करतो मी इशारे
हे जाऊ नको दुर तू…. तुझा रंग मला दे ॥२॥

हो तुझ्या पापण्यांच्या सावली खाली
मला जिंदगी घेऊनी आली
तुझ्या चाहूलीची धुन आनंदे
अंतरास माझ्या छेडूनी गेली
जगण्याची आता मज येई नशा
तू माझे जीवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगिरी
हुर हुर का जिवाला
बोल आता काही तरी
भेट आता कुठेतरी
कसला हा अबोला
हे जाऊ नको दुर तू….तुझा रंग मला दे ॥३॥

गीत : अशोक पत्की
संगीत : अशोक पत्की
स्वर : स्वप्नील बांदोडकर
अल्बम : बेधुंद