१०४. जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....॥१॥
श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......॥२॥
त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........॥३॥
ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........॥४॥
बोला शिवाजी महाराज की ... जय !!
गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment