Wednesday, September 5, 2007

१८६. हिरव्या हिरव्या रंगाची, झाडि घनदाट

१८६. हिरव्या हिरव्या रंगाची, झाडि घनदाट
सांग्‌ गो चेड्‌वा दिस्तां कसो, खंडळ्याचो घाट

हिरव्याहिरव्या झाडीत हिरवीहिरवी पानां,
हिरव्याहिरव्या पानांत वारो गाता गानां
पुना-बाँबे हीच गो तुझ्या, सासरची वाट

खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार,
थंडिमधे लालि चढे गालि गुलजार
तोऱ्यामध्ये होऊ नको, उगी अशी ताठ

बोगद्यात गाडी जाता होई अंधार,
अंधारात प्रीत घेता प्रीतिचो आधार
इंजिनाच्या मागे जाती, डबे मागोमाग

गीत : रमेश अणावकर
संगीत : सूरज
स्वर : जयवंत कुलकर्णी व इतर

१८५. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे

१८५. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे
पापणिच्या पंखांत झोपु दे डोळ्यांची पाखरे ॥धृ.॥

झोपी गेल्या चिमण्या राघू
चिमण्या राजा, नकोस जागू
हिरव्या पानांवरी झोपली वेलींची लेकरे ॥१॥

पुरे खेळणे आता बाळा
थांबव चाळा, थांबव वाळा
शब्द ऐकते झोपेमधुनी, चाळवते वारे ॥२॥

मेघ पांढरे उशास घेउनि
चंद्र-तारका निजल्या गगनी
वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे ॥३॥

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत :वसंत पवार
स्वर :आशा भोसले
चित्रपट :बाळा जो जो रे (१९५१)

Thursday, August 16, 2007

१८४. अंतरीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले

१८४. अंतरीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले
एकदा जे वाटले ते, प्रेम आता आटले

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू
रंगले आभाळ पूर्वी : तेच आता फाटले

एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते, स्नेहतंतू आतले

शेवटी मंदावलेल्या वादळी वाऱ्याप्रमाणे
राहणे झाले दिवाणे, ते गीत गाणे कोठले

गीत : ना. घ. देशपांडे
संगीत :राम फाटक
स्वर :सुधीर फडके

१८३. राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे

१८३. राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्न माझे ?

कापरे ते हात हाती बावरे डोळ्यांत आसू
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू
दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतिचे तकदीर माझे

गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमळे कुंकुमाची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची
आठवे ? म्हंटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे

मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे
वेल दारी सायलीची रोज अजुनी बार देते
लाख पुष्पे तोडिल्याविण, ये भरोनी पात्र माझे

गीत :वा. रा. कांत
संगीत :श्रीनिवास खळे
स्वर :पं. वसंतराव देशपांडे

१८२.चंद्रा रे मी तुझी रोहिणी

१८२.चंद्रा रे मी तुझी रोहिणी
पाहते तुला मोहुनी, लाजुनी

दो जीवांचे अमृत मीलन
रिमझिम बरसत नील नभातुन
मोहरलेली स्पर्ष फुलातून
अंतरीची रातराणी


चंद्रबींब तव समीप आले
चकोर नयनी नाचू लागले
भाव मनाचे हसले लपुनी
फुलत्या कमळातुनी

तुझे नी माझे बांधुन डोळे
लपंडाव ही प्रीत खेळे
अधरावरले गीत गोड ते
जाई रात्र चांदणी

गीत :माहित नाही
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर : लता मंगेशकर
चित्रपट : भाव तिथे देव [१९]

१८१. का धरिला परदेश, सजणा

१८१. का धरिला परदेश, सजणा
का धरिला परदेश ?

श्रावण वैरी बरसे झिरमिर
चैन पडेना जीवा क्षणभर
जाऊ कोठे, राहू कैसी,
घेऊ जोगिणवेष ?

रंग न उरला गाली ओठी
झरती आसू काजळकाठी
शृंगाराचा साज उतरला,
मुक्त विखुरले केश

गीत :शांता शेळके
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर :बकुळ पंडित
नाटक :हे बंध रेशमाचे (१९६८)

१८०. हरिभजनाविण काळ घालवू नको रे

१८०. हरिभजनाविण काळ घालवू नको रे

दोरीच्या सापा भिवुनी भवा
भेटी नाही जिवा-शिवा
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे

विवेकाची ठरेल ओल
ऐसे की बोलावे बोल
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे

संत संगतीने उमज
आणुनि मनी पुरते समज
अनुभवावीण मान हालवू नको रे

सोहिरा म्हणे ज्ञानज्योती
तेथ कैचि दिवस-राती
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे

गीत :संत सोहिरोबानाथ
संगीत : माहित नाही
स्वर :पं. जितेंद्र अभिषेकी