माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे;
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे. ॥धृ.॥
सर्व जगाचे मंगल,मंगल हे माझे गाणे;
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे.
आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत
हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गात. ॥१॥
ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची,
सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची.
निरध्वनी हे, मूकगान हे यास म्हणो कोणी,
नभांत हे साठवले याने दुमदुमली अवनी. ॥२॥
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले;
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले.
शांत, मत्सर, प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला,
चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला. ॥३॥
ही मोक्षाची,स्वातंत्र्याची,उन्नतिची माला,
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली!
मंगल मंगल मद्गानाची गति ही शेवटली.॥४॥
गीतकार : बालकवी
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : लता मंगेशकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment