Monday, July 16, 2007

१६०. अय्या बाई इश्श बाई सांगू काय पुढे ?

१६०. अय्या बाई इश्श बाई सांगू काय पुढे ?
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे ॥धृ.॥

काहीतरी झाले आहे, कोणीतरी आले आहे
त्याचे हसू गोड आहे, मला त्याची ओढ आहे
मला त्याची ओढ आहे, त्याची माझी जोड आहे
सांगताना बोल बाई ओठांवर अडे ॥१॥

माझ्यापाशी झेप आहे, त्याच्या डोळ्यांत झोप आहे
माझ्यापाशी वाण नाही, त्याच्यापाशी जाण नाही
त्याच्यापाशी जाण नाही, साहसाचे त्राण नाही
काय सांगू ? भलतेच वेड मला जडे ॥२॥

माझे मन गात आहे, त्याच्या हाती साथ आहे
माझ्या पायी चाल आहे, त्याच्या हाती ताल आहे
त्याच्या हाती ताल आहे, अशी काही धमाल आहे
त्याच्या मनाआड जाऊन माझे मन दडे ॥३॥

माझ्या शेजारी तो आहे, त्याच्या शेजारी मी आहे
त्याला काही मागायहे आहे, मला काही द्यायचे आहे
मला काही द्यायचे आहे, दोघांना काही प्यायचे आहे
आधी कोणी बोलावे हे जरा कोडे पडे ॥४॥

गीतकार : ग. दि. माडगूळकर
संगीतकार : सुधीर फडके
गायक : सुधीर फडके
चित्रपट : आंधळा मागतो एक डोळा [१९५६]

No comments: