Wednesday, July 4, 2007

१४०. कसे सरतील सये..

१४०. कसे सरतील सये

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फ़ुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ऒठ वर हसे हसे उरातुन वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळीमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

कोण तुझ्या सौधातून ऊभे असे
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ऒले
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फ़ुलं दोन ...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग
जातानाही पायभर मखमल ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया आबोलीची फ़ुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना

गुलाबाची फ़ुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

No comments: