क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे
वेड्या संध्येच्या अंगणी रात थरथरते
कुणी जा दूर तशी मनी हूरहूर
रात ओलावत सूर वात मालवते...
आता बोलायाला कोण संगे चालायाला कोण
कोण टाकेल जीवाचे ओवाळून लिंबलोण
पायरीला ठसे दार खुले छत पिसे
कुण्या उडल्या राव्याचे गीत घर भरते...
आता विझवेल दिवा सांज कापऱ्या हातांनी
आणि आभाळाचे गूज चंद्र सांगेल खुणांनी
पडतील कुणी पुन्हा भरतील डोळे
पुन्हा पुसतील पाणी हात थरथरते...
मनी जागा एक जोगी त्याचे आभाळ फाटके
त्याचा दिशांचा पिंजरा त्याच्या झोळीत चटके
भिजलेली माती त्याचे हललेले मूळ
त्याचे क्षितिजाचे कूळ त्या चालवते...
सांज अबोला अबोला सांज कल्लॊळ कल्लॊळ
सांज जोगीण विरागी सांज साजीरी वेल्हाळ
सांजेवर फूल गंध मौनाचा हवेत
दूर लागले गावात दीप फरफरते...
कवी: संदीप खरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment