दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..
तडा तडा गार गारा गरा गरा फिरे वारा
मेघियाच्या ऒंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..
थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर
ऒल्या ऒल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फिटताना नवे ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..
उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर..
अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ऒले रान रान नव्हे मन तुझे
जशी ऒली हूर हूर तरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment