Thursday, November 23, 2006

५९. माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे;

माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे;
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे. ॥धृ.॥

सर्व जगाचे मंगल,मंगल हे माझे गाणे;
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे.
आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत
हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गात. ॥१॥

ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची,
सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची.
निरध्वनी हे, मूकगान हे यास म्हणो कोणी,
नभांत हे साठवले याने दुमदुमली अवनी. ॥२॥

सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले;
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले.
शांत, मत्सर, प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला,
चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला. ॥३॥

ही मोक्षाची,स्वातंत्र्याची,उन्नतिची माला,
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली!
मंगल मंगल मद्गानाची गति ही शेवटली.॥४॥

गीतकार : बालकवी
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : लता मंगेशकर

५८. सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ? ॥धृ.॥

सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ? ॥धृ.॥
मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ? ॥१॥

हृदयात आहे प्रीत अन ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ? ॥२॥

जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ? ॥३॥

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का ? ॥४॥

गीतकार : सुरेश भट
संगीतकार : राम फाटक
गायक : सुधीर फडके

५७. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात ॥धृ.॥

निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥

गीतकार : सुरेश भट
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : आशा भोसले

Monday, November 20, 2006

५६. दिव्यत्वाची जेथ प्रचिती

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥

गीतकार : बा. भ. बोरकर
संगीत : वसंत प्रभू
गायिका : आशा भोसले
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा (१९६१)

५५. आनंदी-आनंद गडे इकडे, तिकडे, चोहिकडे.

आनंदी-आनंद गडे इकडे, तिकडे, चोहिकडे.
वरती-खाली मोद भरे, वायुसंगे मोद फिरे,
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला,
मोद विहरतो चोहिंकडे, आनंदी-आनंद गडे ॥१॥

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे;
खुलली संध्या प्रेमानें, आनंदे गाते गाणे;
मेघ रंगले, चित्त दंगलें, गान स्फुरलें,
इकडे,तिकडे, चोहिंकडे, आनंदी-आनंद गडे! ॥२॥

नीलनभीं नक्षत्र कसें, डोकावुनि हें पाहतसे;
कुणास बघते? मोदाला!, मोद भेटला का त्याला?
तयामधें तो, सदैव वसतो, सुखे विहरतो,
इकडे,तिकडे, चोहिंकडे, आनंदी-आनंद गडे! ॥३॥

वाहति निर्झर मंदगति, डोलति लतिका वृक्षतती,
पक्षि मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे?
कमल विकसलें, भ्रमर गुंगले, डोलत वदले-
इकडे,तिकडे, चोहिंकडे, आनंदी-आनंद गडे! ॥४॥

स्वार्थाच्या बाजारांत, किती पामरें रडतात;
त्यांना मोद कसा मिळतो? सोडुनि स्वार्था तो जातो-
द्वेष संपला, मत्सर गेला, आतां उरला
इकडे,तिकडे, चोहिंकडे, आनंदी-आनंद गडे! ॥५॥

गीतकार : बालकवी
संगीत : हृदयनाथ मंगेशकर
गायक : लता मंगेशकर

५४. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून, सुटटी मिळेल काय ? ॥धृ.॥

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ? ॥१॥

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवडयातनं रविवार, येतील का रे तीनदा ॥२॥

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ॥३॥

गीतकार : मंगेश पाडगांवकर
संगीत : मीना खडीकर
गायक : रचना खडीकर
योगेश खडीकर
शमा खळे