Wednesday, July 25, 2007

१७९.शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले

१७९.शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले ॥धृ.॥

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले
शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले ॥१॥

होय म्हणालीस नकोनकोतुन
तूच व्यक्त झालीस स्वरातुन
नसता कारण व्याकुळ होवून उगिच हृदय धडधडले
शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले ॥२॥

आठवते पूनवेच्या रात्री
लक्ष चंद्र विरघळले गात्री
मिठीत तुझिया ह्या विश्वाचे रहस्य मज उलगडले
शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले ॥३॥

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत :पु. ल. देशपांडे
स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
आकाशवाणी संगीतिका 'भिल्लण'

१७८. जाईन विचारीत रानफुला

१७८. जाईन विचारीत रानफुला
भेटेल तिथे गं, सजण मला ॥धृ.॥

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळस तरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करीतील गर्द झुला
भेटेल तिथे गं, सजण मला ॥१॥

उंच पुकारील, मोर काननी
निळया ढगांतून भरेल पाणी
लहरेल विजेची सोनसळा
भेटेल तिथे गं, सजण मला ॥२॥

वाहत येईल पूर अनावर
बुडतील वाटा आणि जुने घर
जाईल बुडून हा प्राण खुळा
भेटेल तिथे गं, सजण मला ॥३॥

गीतकार :शांता शेळके
गायक :किशोरी आमोणकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

१७७. पहाटे पहाटे मला जाग आली

१७७. पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली ॥धृ.॥

मला आठवेना, तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली ॥१॥

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
असा राहू दे हात, माझा उशाला
मऊ मोकळे केस, हे सोड गाली ! ॥२॥

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे, हालचाली ! ॥३॥

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणार्‍या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली

गीत :सुरेश भट
संगीत : रवि दाते
स्वर : सुरेश वाडकर

१७६. कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा

१७६. कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा
रात्रीं तरी गाऊं नको, खुलवूं नको अपुला गळा ॥१॥

आधींच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जातां चिंब चुंबन देत दारीं थांबली ॥२॥


हार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला
आतांच आभाळांतला काळोख मीं कुरवाळला ॥३॥


सांभा
ळुनी माझ्या जिवाला मी जरासें घेतलें
इतक्यांत येतां वाजलीं हलकीं निजेंची पावलें ॥४॥

कळवाल का त्या कोकीळा, कीं झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली ॥५॥

गीत : अनिल [आ.रा.देशपांडे]
संगीत : यशवंत देव
स्वर : पं. वसंतराव देशपांडे