Monday, July 16, 2007

१७५. अ आ आई, म म मका

१७५. अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका ॥धृ.॥

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा ॥१॥

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन्‌ हसा ॥२॥

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई ॥३॥

गीतकार : मधुसूदन कालेलकर
संगीतकार : राम कदम
गायक : मन्ना डे
चित्रपट :एक धागा सुखाचा [१९६०]

१७४. अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव

१७४. अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव ॥धृ.॥

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले
आता दे परि सारे सरले, उरलं मागं नाव ॥१॥

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता, धरती दे गं ठाव ॥२॥

गीतकार : शांता शेळके
संगीतकार :आनंदघन
गायक :लता मंगेशकर
चित्रपट :मराठा तितुका मेळवावा [१९६४]

१७३. अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी:

१७३. अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी:
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती ॥धृ.॥

इथे सुरु होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती ॥१॥

सर्व बंध तोडुनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती ॥२॥

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी ॥३॥

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती ॥४॥

गीतकार : मंगेश पाडगावकर
संगीतकार :यशवंत देव
गायक :अरूण दाते

१७२. अगा करुणाकरा करितसे धांवा ।

१७२. अगा करुणाकरा करितसे धांवा ।
या मज सोडवा लवकरी ॥१॥

ऐकोनियां माझी करुणेची वचने ।
व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥

मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।
ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥

उशीर तो आतां न पाहिजे केला ।
अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥

उरलें तें एक हेंचि मज आतां ।
अवघें विचारितां शून्य झालें ॥५॥

तुका म्हणे आतां करीं कृपा दान
पाउलें समान दावीं डोळा ॥६॥

गीतकार : संत तुकाराम
संगीतकार :श्रीनिवास खळे
गायक :लता मंगेशकर

१७१. अजब सोहळा ! अजब सोहळा !

१७१. अजब सोहळा ! अजब सोहळा !
माती भिडली आभाळा ! ॥धृ.॥

मुकी मायबाई
तिला राग नाही
तुडवून पायी तिचा केला चोळामोळा ॥१॥

किती काळ साहील ?
किती मूक राहील ?
वादळली माती करी वा-याचा हिंदोळा ! ॥२॥

कुणी पाय देता
चढे धूळ माथा
माणसा रे, आता बघ उघडून डोळा ! ॥३॥

मातीची धरती
देह मातीचा वरती
माती जागवू दे मातीचा जिव्हाळा ! ॥४॥

गीतकार : शांता शेळके
संगीतकार : भास्कर चंदावरकर
गायक : रवींद्र साठे
चित्रपट : गारंबीचा बापू [१९८०]

१७०. अजि सोनियाचा दिनु ।

१७०. अजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्यभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजीत वनमाळी ॥३॥

बरवा संत समागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरु ।
बाप रखमादेविवरु ॥५॥

गीतकार : संत ज्ञानेश्वर
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : लता मंगेशकर

१६९. अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना

१६९. अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! ॥१॥

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ! ॥२॥

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ॥३॥

गीतकार : आ. रा. देशपांडे
संगीतकार :कुमार गंधर्व
गायक :कुमार गंधर्व
(हे गीत कवीने आपल्या पत्नीच्या दु:खद निधन प्रसंगी लिहीले आहे.)

१६८. अणुरेणिया थोकडा ।

१६८. अणुरेणिया थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥

गिळुन सांडले कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥

सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटी ॥३॥

तुका म्हणे आता ।
उरलो उपकारापुरता ॥४॥

गीतकार : संत तुकाराम
संगीतकार : राम फाटक
गायक : पं. भिमसेन जोशी

१६७. अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया ॥धृ.॥

१६७. अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया ॥धृ.॥

विरहाचे ऊन बाई, देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी, चंदनाची छाया ॥१॥

नाही आग आनी धग, परी होई तगमग
विस्तवाशिवाय पेटे, कापराची काया ॥२॥

सुगंधाने झाले धुंद, जीव झाला ग बेबंद
देहभान मी विसरावे, अशी करा माया ॥३॥

गीतकार : कवी संजीव
संगीतकार : वसंतकुमार मोहिते
गायक : आशा भोसले
चित्रपट : भाऊ - बीज [१९५५]

१६६. अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा

१६६. अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म न्याय नीति सारा खेळ कल्पनेचा ॥धृ.॥

ध्यास एक हृदयी धरूनी स्वप्न रंगवावे
वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे !
सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा ॥१॥

दैव ज्यास लाभे त्याला लाभ वैभवाचा
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा
वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा ॥२॥

गीतकार :
वसंत कानेटकर

संगीतकार : पं. जितेंद्र अभिषेकी
गायक : आशालता वाबगावकर
नाटक : मत्स्यगंधा

१६५. अधिक देखणें तरी निरंजन पाहणे

१६५. अधिक देखणें तरी निरंजन पाहणे
योगिराज विनवणें मना आलें वो माये ॥१॥

देह बळी देऊनी साधिलें म्यां साधनीं ।
तेणे समाधान मज जोडलें वो माये ॥२॥

अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।
सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥

चंदन जेवीं भरका अश्वत्थ फुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥

पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।
निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥

ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु ।
विठ्ठलीं निर्धारु म्यां देखिला वो माये ॥६॥

गीतकार : संत ज्ञानेश्वर
संगीतकार : राम फाटक
गायक : पं. भिमसेन जोशी

१६४. अपर्णा तप करिते काननी

१६४. भस्मविलेपित रुप साजिरे आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करिते काननी ॥ धृ.॥

वैभवभूषित वैकुंठेश्वर
तिच्या पित्याने योजियला वर
भोळा शंकर परी उमेच्या भरलासे लोचनी
अपर्णा तप करिते काननी ॥१॥

त्रिशूल डमरु पिनाकपाणी
चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि
युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी
अपर्णा तप करिते काननी ॥२॥

कोमल सुंदर हिमनगदुहिता
हिमाचलावर तप आचरिता
आगीमधुनी फूल कोवळे फुलवी रात्रंदिनी
अपर्णा तप करिते काननी ॥३॥

गीतकार : शांता शेळके
संगीतकार : आनंदघन
गायक : लता मंगेशकर
चित्रपट : तांबडी माती [१९६९]

१६३. अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी ।

१६३. अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी ।
जाणीव हीच माझ्या जीवा सदैव जाळी ॥धृ.॥

जन्मात एक झाली ही प्रीतभेट देवा
डोळ्यांतुनी हळू या हृदयात पाय ठेवा
बोलू न द्यायची मी भलतेच लाभवेळी ॥१॥

राष्ट्रार्थ जन्मलेला मी पाहुणा क्षणाचा
भासात गुंतवावा मी जीव का कुणाचा ?
अक्षम्य चूक झाली, मी प्रीत दाखवीली ॥२॥

तू लाख पीडितांचा आधार अन्‌ विसावा
हा पोच मूढ माझ्या प्रीतीस का नसावा ?
मी संत मोहवीला जो मग्न संतमेळी ॥३॥

आता पुढील जन्मी संसार मी करीन
ही स्वप्नभेट वक्षी मी तोवरी धरीन
सद्भाभाग्य हे सतीचे मिरवीन नित्य भाळी ॥४॥

गीतकार : ग. दि. माडगूळकर
संगीतकार : सुधीर फडके
गायक : मालती पांडे, सुधीर फडके
चित्रपट : वंदे मातरम्‌ [१९४८]

१६२. अबीर गुलाल उधळीत रंग

१६२. अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥

उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥

वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥

गीतकार : संत चोखामेळा
संगीतकार : पं. जितेंद्र अभिषेकी
गायक : पं. जितेंद्र अभिषेकी

१६१. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

१६१. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा का बा न घे ॥धृ.॥

सांग पंढरीराया काय करू यांसी
का रूप ध्यानासी न ये तुझे ॥१॥

किर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले विषयसुखा ॥२॥

हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती
नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥३॥

गीतकार : संत नामदेव
संगीतकार : बाळ माटे
गायक : माणिक वर्मा

१६०. अय्या बाई इश्श बाई सांगू काय पुढे ?

१६०. अय्या बाई इश्श बाई सांगू काय पुढे ?
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे ॥धृ.॥

काहीतरी झाले आहे, कोणीतरी आले आहे
त्याचे हसू गोड आहे, मला त्याची ओढ आहे
मला त्याची ओढ आहे, त्याची माझी जोड आहे
सांगताना बोल बाई ओठांवर अडे ॥१॥

माझ्यापाशी झेप आहे, त्याच्या डोळ्यांत झोप आहे
माझ्यापाशी वाण नाही, त्याच्यापाशी जाण नाही
त्याच्यापाशी जाण नाही, साहसाचे त्राण नाही
काय सांगू ? भलतेच वेड मला जडे ॥२॥

माझे मन गात आहे, त्याच्या हाती साथ आहे
माझ्या पायी चाल आहे, त्याच्या हाती ताल आहे
त्याच्या हाती ताल आहे, अशी काही धमाल आहे
त्याच्या मनाआड जाऊन माझे मन दडे ॥३॥

माझ्या शेजारी तो आहे, त्याच्या शेजारी मी आहे
त्याला काही मागायहे आहे, मला काही द्यायचे आहे
मला काही द्यायचे आहे, दोघांना काही प्यायचे आहे
आधी कोणी बोलावे हे जरा कोडे पडे ॥४॥

गीतकार : ग. दि. माडगूळकर
संगीतकार : सुधीर फडके
गायक : सुधीर फडके
चित्रपट : आंधळा मागतो एक डोळा [१९५६]

१५९. अरुपास पाहे रुपी तोच भाग्यवंत

१५९. अरुपास पाहे रुपी तोच भाग्यवंत
निसर्गात भरूनी राहे अनादी अनंत ॥धृ.॥

कधी पावसाच्या धारा
भणाणता केव्हा वारा
पहाटेस होऊन तारा
हसे रूपवंत ॥१॥

ग्रीष्म रक्त पेटवणारा
शिशिर आग गोठवणारा
मनोगते मिळविणारा
फुलारी वसंत ॥२॥

कुशीमध्ये त्याच्या जावे
मिठीमध्ये त्याला घ्यावे
शाश्वतात विरूनी जावे
सर्व नाशवंत ॥३॥

गीतकार : सुधीर मोघे
संगीतकार : राम फाटक
गायक : श्रीकांत पारगावकर

१५८. अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।

१५८. अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।
तुझें तुज ध्यान कळो आले ॥१॥

तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।
फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥

मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।
कोठें तुज रेतें न दिसे रया ॥३॥

दीपकीं दिपक मावळल्या ज्योती ।
घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥

वृत्तीची निवृत्ती आपणांसकट ।
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥

निवृत्ति परमानुभव नेमा ।
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

गीतकार : संत ज्ञानेश्वर
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : लता मंगेशकर

१५७. अरे खोप्यामधी खोपा

१५७. अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला ॥१॥

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला ॥२॥

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा ॥३॥

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं ॥४॥

गीतकार : संत बहिणाबाई चौधरी
संगीतकार : वसंत पवार
गायक : आशा भोसले
चित्रपट : मानिनी [१९६१]

१५६. अरे मनमोहना,

१५६. अरे मनमोहना,
कळली देवा तुला, राधिका रे राधिका
कळली राधिका रे कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही ॥धृ.॥

सात सुरांना तन-मन नाचे
तालावरती मधुबन नाचे
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही ॥१॥

धुंद सुगंधई यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी
जीवन माझे अंधाराचे
काळी काळी रात कधी टळली नाही ॥२॥

उन्हात काया, मनात छाया
कशी समजवू वेडी माया
युग युग सरले, डोळे भरले
आशेची कळी कधी फुलली नाही ॥३॥

गीतकार : माहित नाही
संगीतकार : एन्‌. दत्ता
गायक :आशा भोसले
चित्रपट : बाळा गाउ कशी अंगाई [१९७७]

१५५. अवघा चि संसार सुखाचा करीन

१५५. अवघा चि संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥

जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥

सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥

बाप रखुमादेविवरा विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥

गीतकार : संत ज्ञानेश्वर
संगीतकार : मा. कृष्णराव
गायक : मधुवंती दांडेकर
चित्रपट : संत कान्होपात्रा [१९३१]

१५४. अवघे गर्जे पंढरपूर

१५४. अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाच गजर ॥धृ.॥

टाळघोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ति
पांडुरंगी नाहले हो
चंद्रभागा नीर ॥१॥

इडापिडा टळुनि जाती
देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगले हो
संतांचे माहेर ॥२॥

देव दिसे ठाई ठाई
भक्त लीन भक्तापाई
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर ॥३॥

गीतकार :अशोकजी परांजपे
संगीतकार : पं. जितेंद्र अभिषेकी
गायक :प्रकाश घांग्रेकर
नाटक : गोरा कुंभार [१९७८]

१५३. अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळु

१५३. अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळु
मी म्हणे गोपाळु, आला ते माये ॥१॥

चांचरती चांचरती बाहेरी निघाले
ठकचि मी ठेलें काय करु ॥२॥

तो सावळा सुंदरु कासे पितांबरू
लावण्य मनोहरु देखियला ॥३॥

बोधुनी ठेलें मन तव जालें आन
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥

बाप रखुमादेवी वरू विठ्ठल सुखाचा
तेणें काया मने वाचा वेधियलें ॥५॥

गीतकार : संत ज्ञानेश्वर
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : लता मंगेशकर

१५२. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती

१५२. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा पहिलावहिला
झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती ॥१॥

फुलून येता फूल बोलले
मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परी निरंतर गंधित झाली माती ॥२॥

हात एक तो हळु थरथरला
पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती ॥३॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजुनही गाती ॥४॥

गीतकार : मंगेश पाडगावकर
संगीतकार : यशवंत देव
गायक : सुधीर फडके

१५१. वेडात मराठे वीर दौडले सात

१५१. म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले
म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले सात... ॥धृ.॥

"श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता
रण सोडुनि सेनासागर अमुचे पळता
अबलाहि घरोघर खया

ते फ़िरता बाजुस डोळे...किन्चित ओले...
सरदार सहा सरसवुनी उठले शेले
रिकबित टाकले पाय...झेलले भाले
उसळित धुळिचे मेघ सात निमिषात... ॥१॥

आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना
अपमान् बुजविण्या सात अरपुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात... ॥२॥

खालुन आग, वर आग ,आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात... ॥३॥

दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरन्गे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वारयावर गात ॥४॥
म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले सात...