Showing posts with label ग. Show all posts
Showing posts with label ग. Show all posts

Wednesday, October 10, 2007

२०२. गालावर खळी डोळ्यात धुंदी

२०२. गालावर खळी डोळ्यात धुंदी ॥धृ.॥

ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका इशार्‍याची
जाऊ नको दुर तू
अशी ये समोर तू
माझा रंग तू घे
तुझा रंग मला दे
गालावर खळी…. रंग मला दे ॥१॥

हो कोणता हा मोसम मस्त रंगांचा
तुझ्या सवे माझ्या जीवनी आला
सूने सूने होते किती मन माझे
आज तेच वाटे धुंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खरे
तुझ्यासाठी जीव झुरे
मन माझे थरारे
कधी तुझ्या पुढे पुढे
कधी तुझ्या मागे मागे
करतो मी इशारे
हे जाऊ नको दुर तू…. तुझा रंग मला दे ॥२॥

हो तुझ्या पापण्यांच्या सावली खाली
मला जिंदगी घेऊनी आली
तुझ्या चाहूलीची धुन आनंदे
अंतरास माझ्या छेडूनी गेली
जगण्याची आता मज येई नशा
तू माझे जीवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगिरी
हुर हुर का जिवाला
बोल आता काही तरी
भेट आता कुठेतरी
कसला हा अबोला
हे जाऊ नको दुर तू….तुझा रंग मला दे ॥३॥

गीत : अशोक पत्की
संगीत : अशोक पत्की
स्वर : स्वप्नील बांदोडकर
अल्बम : बेधुंद

Friday, September 14, 2007

१९४. वेगवेगळी फुले उमलली, रचुनि त्यांचे झेले

१९४. वेगवेगळी फुले उमलली, रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले, गेले ! ते दिन गेले ॥धृ.॥

कदंब-तरूला बांधुनि दोला, उंच-खालती झोले
परस्परांनी दिले-घेतले, गेले ! ते दिन गेले

हरीत बिलोरी वेलबुटीवरि, शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनी किती झोकले, गेले ! ते दिन गेले

निर्मलभावे नव देखावे, भरुनी दोन्ही डोळे
तू मी मिळुनी रोज पाहिले, गेले ! ते दिन गेले

गीत : भवानी शंकर पंडित
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : पं. हृदयनाथ मंगेशकर

१९३. गणराज रंगि नाचतो, नाचतो,

१९३. गणराज रंगि नाचतो, नाचतो,
पायि घागऱ्या करिती रुणुझुणु
नाद स्वर्गि पोचतो ॥धृ.॥

कटि पीतांबर कसुन भर्जरी
बाल गजानन नर्तनासि करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो ॥१॥

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रम्हा धरितो तालहि रंगुन
मृदंग धिमि वाजतो ॥२॥

देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदशिव
शिशुकौतुक पाहतो ॥३॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर

१९२. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

१९२. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! ॥धृ.॥

सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया ॥१॥

गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया ॥२॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर

Wednesday, September 5, 2007

१८८. गोमू माहेरला जाते हो नाखवा

१८८. गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा ॥धृ.॥

दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा ॥१॥

कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा ॥२॥

सोडून दे रे खोड्या साऱ्या
शिडात शिर रे अवखळ वाऱ्या
झणी धरणीला गलबत टेकवा ॥३॥

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : दत्ता डावजेकर
स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
चित्रपट : वैशाख वणवा (१९६४)