Showing posts with label प. Show all posts
Showing posts with label प. Show all posts

Wednesday, October 31, 2007

२०७. पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची

२०७. पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू आशी घडे ही या दोन लोचनांची ॥धृ.॥

पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न रहिले मी, किमया अशी कुणाची ? ॥१॥

डोळे मिटून घेता दिसतोस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन्‌ नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याहि भावनांची ॥२॥

लाजून वाजती या अंगातुनी सतारी
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्ने ही मीलनाची ॥३॥

वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यांत वाचतो अन्‌ या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची ॥४॥

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : सुमन कल्याणपूर, अरुण दाते

Wednesday, July 25, 2007

१७७. पहाटे पहाटे मला जाग आली

१७७. पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली ॥धृ.॥

मला आठवेना, तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली ॥१॥

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
असा राहू दे हात, माझा उशाला
मऊ मोकळे केस, हे सोड गाली ! ॥२॥

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे, हालचाली ! ॥३॥

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणार्‍या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली

गीत :सुरेश भट
संगीत : रवि दाते
स्वर : सुरेश वाडकर

Thursday, July 5, 2007

१४८. पाउस

तुझ्या-माझ्या सवे कधी गायचा पाउसही
तुला बोलावता पोचायचा पाउसही

पडे ना पापणी पाहुन ओले मी तुला
कसा होता नी नव्हता व्हायचा पाउसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाउसही

मला पाहुन ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला शिकवायचा पाउसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाउसही

आता शब्दांवरी फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाउसही

कवी: संदीप खरे

Friday, November 17, 2006

२८. प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया ॥धृ.॥

प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया ॥धृ.॥

विघ्न विनाशक, गुणिजन पालक, दुरीत तिमीर हारका
सुखकारक तूं, दु:ख विदारक, तूच तुझ्या सारखा
वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभू राया ॥१॥

सिद्धी विनायक, तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विद्याधीशा, गणाधीपा वत्सला
तूच ईश्वरा सहाय्य करावे, हा भव सिंधू तराया ॥२॥

गजवदना तव रूप मनोहर, शुक्रांबर शिवसुता
चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता
ॠद्धी सिद्धीच्या वरा, दयाळा, देई कृपेची छाया ॥३॥

गायक : पं. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल
गीतकार : शांताराम नांदगावकर
संगीत : अनिल - अरूण
चित्रपट : अष्टविनायक [१९७९]

१५. प्रेमा, काय देउं तुला ?

प्रेमा, काय देउं तुला ?
भाग्य दिलें तूं मला ॥धृ.॥
प्रीतीच्या या, पांखराचे
रत्नकांचनी पंख देऊं का ?
देऊं तुला का, हर्षगंध हा
जीव-फुलांतुन मोहरलेला? ॥१॥
या हृदयींच्या जलवंतीची
निळी ओढणी तुला हवी का?
रूप-मोहिनी लावण्याची
हवी तुझ्या का चंद्रकलेला? ॥२॥
मोहक सूंदर जें जें दिसतें
तूंच तयाचा जन्म दाता
घेशील का रे माझ्याकरितां
अधरींच्या या अमृताला? ॥३॥

गायिका : लता मंगेशकर
गीतकार : पी. सावळाराम
संगीत : वसंत प्रभू

१४. प्रिया आज माझी, नसे साथ द्याया

प्रिया आज माझी, नसे साथ द्याया
नको धुंद वारे नको चांदण्या या ॥धृ.॥
नको पारिजाता धरा भूषवूं ही
पदांची तिच्या आज चाहूल नाहीं
प्रियेवीण आरास जाईल वायां ॥१॥
फुलें सान झेलूं तरी भार होतो
पुढें वाट साधी तरी तोल जातो
कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या ॥२॥
अतां आठवीतां तशा चांदराती
उरे मौक्तिकावीण शिंपाच हातीं
उशाला उभी ती जुनी स्वप्नमाया ॥३॥
न शांती जिवाला न प्राणास धीर
कसा आज कंठांत येईल सूर
उरीं वेदना मात्र जागेल गाया ॥४॥

गायक : सुधीर फडके
गीतकार : यशवंत देव
संगीत : प्रभाकर जोग

१२. प्रेम स्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !

प्रेम स्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावुं तूज आतां मी कोणत्या उपायीं ? ॥१॥
तूं माय, लेकरूं मी, तूं गाय, वासरूं मी,
ताटातुटी जहाली आतां कसें करूं मी ? ॥२॥
गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा,
अन् राहिला कधींचा तान्हा तिचा भुका ना? ॥३॥
तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरिहि वाहे -
जाया सती शिरे जी आगींत, शांत राहे, ॥४॥
नैष्ठुर्य त्या सतीचें तूं दाविलेंस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचें सामीप्य साधण्यातें ॥५॥
नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्तीं आई, तरीहि जाची ॥६॥
चित्तीं तुझी स्मरेना कांहींच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका ॥७॥
विद्याधनप्रतिष्ठा: लाभे अतां मला ही
आईविणें परी मी हा पोरकाच राहीं ॥८॥
सारें मिळे परंतु आई पुन्हां न भेटे,
तेणें चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे ॥९॥
आई तुझ्या वियोगें ब्रम्हांड आठवे गे
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगें ॥१०॥
किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोतीं
अव्यक्त अश्रुधारा कीं तीर्थरूप ओती ॥११॥

गायक : गजाननराव वाटवे
गीतकार : माधव जुलियन
संगीत : जी. एन्. जोशी

Thursday, November 16, 2006

६. पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा

पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा
वधू लाजरी झालिस तूं गं, सांगे तो चौघडा ॥धृ.॥

बाजुबंद त्या गोठ-पाटल्या, बिलवर नक्षीदार
तुझ्या हृदीं गे कुणी छेडिली, रतिवीणेची तार
सांग कुणीं गं अंगठींत या तांबुस दिधला खडा ॥१॥

मुंडावळि या भाळीं दिसती, काजळ नयनांगणीं
करकमळापरि कुणीं गुंफिले सुवासिनीचे मणी
आठवणींचा घेऊन जा तूं, माहेराला घडा ॥२॥

स्वप्नफुलांसह रमत रहा तूं, प्रेमळ संसारी
भाग्यवेल ही मोहरेल गं, उद्या तुझ्या दारीं
सौख्य पाहतां भिजुं दे माझ्या, डोळ्यांच्या या कडा ॥३॥

गायिका : सुमन कल्याणपुर
गीतकार : मधुकर जोशी
संगित : वसंत प्रभू
चित्रपट : माहित नाही