Monday, October 1, 2007

२०१. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

२०१. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता ॥धृ.॥

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता ॥१॥

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता ॥२॥

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता ॥३॥

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता ॥४॥

गीत : ग्रेस
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट : वावटळ

२००. तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,

२००. तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची ॥धृ.॥

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची ॥१॥

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची ॥२॥

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची ॥३॥

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची ॥४॥

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची ॥५॥

गीत : आरती प्रभू
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट : निवडूंग [१९८९]

१९९. या सुखांनो या

१९९. या सुखांनो या
एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या, साथ द्या ॥धृ.॥

विरहांतीचा एकांत व्हा, अधीर व्हा आलिंगने
गाली ओठी व्हा सुखांनो, भाव वेडी चुंबने
हो‌उनी स्वर वेळूचे, वाऱ्यासवे दिनरात या, गात या ॥१॥

आमुच्या बागेत व्हा, लडिवाळ तुम्ही पाखरे
शयनघरच्या या छताची, व्हा रुपेरी झुंबरे
होऊ द्या घर नांदते, तुम्हीच त्यांना घास द्या, साथ द्या ॥२॥

अंगणी प्राजक्त व्हा, सौधावरी व्हा चांदणे
जोडप्याचे गूज जुईचे, चिमुकल्यांचे रांगणे
यौवनी सहजीवनी, दोन्ही मनांचे गीत व्हा, प्रीत व्हा ॥३॥

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : सुधीर फडके
स्वर : आशा भोसले
चित्रपट : या सुखांनो या (१९७५)

१९८. निळासावळा नाथ, तशीही निळी सावळी रात

१९८. निळासावळा नाथ, तशीही निळी सावळी रात
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात ॥धृ.॥

तुडवूनि वन, धुंडुनी नंदनवन
शोधुनि झाले अवघे त्रिभुवन
एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात ॥१॥

नील जळी यमुनेच्या साची
होडि सोडिली मी देहाची
गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासांत ॥२॥

गीत : गंगाधर महांबरे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : कुंदा बोकील