Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

Wednesday, September 5, 2007

१८६. हिरव्या हिरव्या रंगाची, झाडि घनदाट

१८६. हिरव्या हिरव्या रंगाची, झाडि घनदाट
सांग्‌ गो चेड्‌वा दिस्तां कसो, खंडळ्याचो घाट

हिरव्याहिरव्या झाडीत हिरवीहिरवी पानां,
हिरव्याहिरव्या पानांत वारो गाता गानां
पुना-बाँबे हीच गो तुझ्या, सासरची वाट

खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार,
थंडिमधे लालि चढे गालि गुलजार
तोऱ्यामध्ये होऊ नको, उगी अशी ताठ

बोगद्यात गाडी जाता होई अंधार,
अंधारात प्रीत घेता प्रीतिचो आधार
इंजिनाच्या मागे जाती, डबे मागोमाग

गीत : रमेश अणावकर
संगीत : सूरज
स्वर : जयवंत कुलकर्णी व इतर

Thursday, August 16, 2007

१८०. हरिभजनाविण काळ घालवू नको रे

१८०. हरिभजनाविण काळ घालवू नको रे

दोरीच्या सापा भिवुनी भवा
भेटी नाही जिवा-शिवा
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे

विवेकाची ठरेल ओल
ऐसे की बोलावे बोल
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे

संत संगतीने उमज
आणुनि मनी पुरते समज
अनुभवावीण मान हालवू नको रे

सोहिरा म्हणे ज्ञानज्योती
तेथ कैचि दिवस-राती
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे

गीत :संत सोहिरोबानाथ
संगीत : माहित नाही
स्वर :पं. जितेंद्र अभिषेकी

Monday, July 2, 2007

१३५. हात तुझा हातातुन धुंद ही हवा

१३५. हात तुझा हातातुन धुंद ही हवा
रोजचाच चंद्र आज भासतो नवा ॥धृ.॥

रोजचेच हे वारे , रोजचेच तारे
भासते परी नवीन विश्व आज सारे
ही किमया स्पर्शाची भारिते जीवा ॥१॥

या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया
मोहरले ह्रुदय तसे मोहरली काया
चांदण्यात थरथरतो मधुर गारवा ॥२॥

जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो
स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो
बिलगताच जाईचा उमलतो थवा ॥३॥

क्षणभर मिटले डोळे , सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज रक्तातुन वाहे
आज फ़ुले प्राणातुन केशरी दिवा ॥४॥

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : सुधा मल्होत्रा, अरूण दाते

१२३.ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा

१२३.ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ? ॥धृ.॥

जेथे मिळे धरेला, आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रवीबिंब टेकलेले
जेथे खुळया ढगांनी, रंगीन साज ल्यावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ? ॥१॥

घे साउली उन्हाला कवळून बाहुपाशी
लागुन ओढ वेडी खग येति कोटरासी
एक एक चांदणीने नभदीप पाजळावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ? ॥२॥

स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला, मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा, स्वप्नीच वेध घ्यावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ? ॥३॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले

Thursday, June 28, 2007

११६. हे बंध रेशमाचे

११६. पथ जात धर्म किंवा नाते ही ज्या न ठावे,
ते जाणतात एक,प्रेमास प्रेम द्यावे;
हृदयात जागणार्‍या अतिगूढ संभ्रमाचे,
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥१॥

विसरून जाय जेव्हा माणूस माणसाला,
जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाळा,
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमांचे.
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥२॥

क्षण एक पेटणारे हे युद्धवेड आहे
देहाहुनी निराळी रक्तास ओढ आहे
तीर्थाहुनी निराळे पावित्र्य संगमाचे
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥३॥

हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा,
धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा,
बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे.
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥४॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक : हे बंध रेशमाचे [१९६८]

११२. हे चांदणे फुलांनी, शिंपीत रात्र आली

११२. हे चांदणे फुलांनी, शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी, ओल्या दवांत न्हाली ॥धृ.॥

तारे निळे नभांत, हे गूज सांगतात
का रंग वेगळा हा, खुलत्या नव्या कळीत
ओठांतल्या स्वरांना, का जाग आज आली ॥१॥

तो स्पर्श चंदनाचा, की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला, स्वप्नातल्या स्वरांचा
ही रात्र धूंद होती, स्वप्नात दंगलेली ॥२॥

वाटे हळूच यावा करपाश या गळ्यात
मैफिल ही सरावी ही धुंद त्या मिठीत
आनंद आगळा हा ही जाग आज आली ॥३॥

गीत : मधुसूदन कालेलकर
संगीत : प्रभाकर जोग
स्वर : अनुराधा पौडवाल
चित्रपट : चांदणे शिंपीत जाशी [१९८२]

Wednesday, June 27, 2007

१०१. हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

१०१. हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ॥१॥

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे, भंगले
जाहली राजधान्यांची, जंगले
परदास्य-पराभवि सारी, मंगले
या जगति जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ॥२॥

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ॥३॥

गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

Friday, November 17, 2006

५२. हे स्वरांनो, चंद्र व्हा

हे स्वरांनो, चंद्र व्हा
चांदण्यांचे कोष माझ्या, प्रियकराला पोचवा ॥धृ.॥

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥१॥

गायक : पं. जितेंद्र अभिषेकी
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
गीत : वि. वा शिरवाडकर
नाटक : ययाति आणि देवयानी

३४. हा माझा मार्ग एकला !

हा माझा मार्ग एकला !
शिणलो तरिही चालणे मला ॥धृ.॥

दिसले सुख तो लपले फिरुनी
उरले नशिबी झुरणे दुरुनी
बघता बघता खेळ संपला ! ॥१॥

सरले रडणे उरले हसणे
भवती रचितो भलती व्यसने
विझवू बघतो जाळ आतला ! ॥२॥

जगतो अजुनी जगणे म्हणुनी
जपतो जखमा हृदयी हसुनी
छळते अजुनी स्वप्न ते मला ! ॥३॥

गायक : सुधीर फडके
गीत : शांता शेळके
संगीत : सुधीर फडके
चित्रपट : हा माझा मार्ग एकला (१९६३)

३०. ही गुलाबी हवा

ही गुलाबी हवा
वेड लावी जीवा
हा या श्वासातही,
ऐकू ये मारवा ॥धृ.॥ (२)

तार छेडी कुणी,
रोमरोमातुनी
गीत झंकारले,
आज माझ्या मनी.
सांज वाऱ्यातही,
गंध दाटे नवा
ऐकू ये मारवा ॥१॥

ही गुलाबी हवा
वेड लावी जीवा
हा या श्वासातही,
ऐकू ये मारवा ॥धृ.॥ (२)

का कुणी रंग हे,
उधळले अंबरी
भान हरपून मी,
कावरीबावरी
का कळेना तरी,
बोलतो पारवा
ऐकू ये मारवा ॥१॥

ही गुलाबी हवा
वेड लावी जीवा
हा या श्वासातही,
ऐकू ये मारवा ॥धृ.॥ (२)

गायिका : वैशाली सामंत
गीतकार : गुरू ठाकूर
संगीतकार : अवधूत गुप्ते
चित्रपट : गोलमाल

Thursday, November 16, 2006

५. हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता

राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता ॥धृ.॥

पाहिले तुला न मी, तरी ही नित्य पाहते
लाजूनी मनोमनी, उगीच धूंद राहते
ठावूक न मजसी जरी निषध देश कोणता ॥१॥

दिवस रात्र ओढणी, या मनास लागते
तुझीच जाहल्या परी, मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते, तुझी अमोल योग्यता ॥२॥

निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नाद चित्र रेखितो, तुझेच मंद कुजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागूता ॥३॥

गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :आशा भोसले
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :सुवासिनी - १९६१