Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

Friday, September 14, 2007

१९७. दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही

१९७. दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही
नाव आहे चाललेली, कालही अन्‌ आजही ॥धृ.॥

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा
मी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा ॥१॥

याद नाही, साद नाही ना सखी ना सोबती
नाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती ॥२॥

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली दूरची हाले हवा ॥३॥

एकला मी नाही जैसा, नाही नाही मी दुणा
जीवनाला ऐल नाही पैल तैसा मध्य ना ॥४॥

गीत : आरती प्रभू
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर

१९६. दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले

१९६. दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले
प्रगटता अवनितलि कोण त्या लोपवी ॥धृ.॥

शौर्यसागर-लहरि गगन-मंडळ महा
भेदिता कवण त्या अबल कर थोपवी ? ॥१॥

गीत : वीर वामनराव जोशी
संगीत : वझेबुवा
स्वर : दिनानाथ मंगेशकर
नाटक : रणदुंदुभि (१९२७)

Thursday, July 5, 2007

१४४. दिवस असे की.

दिवस असे की कोणी माझा नाही
अन्‌ मी कुणाचा नाही...

आकाशाच्या छत्रीखाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणवत नाही
दिवस असे की...

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्‌याला लगाम शोधीत आहे
परि मजला गवसत नाही
दिवस असे की...

मी तुसडा की मी भगवा बैरागी
मद्यपि वा मी गांजेवाला जोगी
अस्तित्वाला हजार नावे देतो
परि नाव ठेववत नाही
दिवस असे की...

’मम’ म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांचाही आता
मेघ पालवत नाही

दिवस असे की कोणी माझा नाही
अन्‌ मी कुणाचा नाही...

कवी: संदीप खरे

Monday, July 2, 2007

१२७.दिवस तुझे हे फुलायचे,

१२७.दिवस तुझे हे फुलायचे,
झोपाळ्यावाचून झुलायचे! ॥धृ.॥

स्वप्नात गुंगत जाणे,वाटेत भेटते गाणे,
गाण्यात हृदय झुरायचे! ॥१॥

मोजावी नभाची खोली,घालावी शपथ ओली,
श्वासात चांदणे भरायचे! ॥२॥

थरारे कोवळी तार,सोसेना सुरांचा भार,
फुलांनी जखमी करायचे! ॥३॥

माझ्या या घराच्या पाशी,थांब तू गडे जराशी,
पापण्या मिटून भुलायचे!!! ॥४॥

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
स्वर : अरूण दाते

Wednesday, June 27, 2007

१००. दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही

१००. दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही ॥धृ.॥

भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रुप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई ॥१॥

असा भरुन ये ऊर, जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या, मग भिजूनीया जाई ॥२॥

आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा
कशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ आभाळ दूर पसरुन राही ॥३॥

गायक : अरूण दाते
गीतकार : माहित नाही
संगीत : माहित नाही

Wednesday, December 13, 2006

७८. दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे

७८. दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची, शपथ तुला आहे ॥धृ.॥

बकुळीच्या झाडाखाली, निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली, सुगंधी क्षणांत
त्या सगळया बकुळ फुलांची, शपथ तुला आहे ॥१॥

शुभ्रफुले वेचित रचिला, चांद तू जुईचा
म्हणालीस, चंद्रोत्सव हा सावळया भुईचा
फुलातल्या त्या चंद्राची, शपथ तुला आहे ॥२॥

भुरभुरता पाऊस होता, सोनिया उन्हात
गवतातून चालत होतो, मोहूनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची, शपथ तुला आहे ॥३॥

हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटूनी येती, असे अंतरंगी
या उदास आभाळाची, शपथ तुला आहे ॥४॥

गायक :अरुण दाते

Monday, November 20, 2006

५६. दिव्यत्वाची जेथ प्रचिती

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥

गीतकार : बा. भ. बोरकर
संगीत : वसंत प्रभू
गायिका : आशा भोसले
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा (१९६१)

Friday, November 17, 2006

४८. दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे

दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने ॥धृ.॥

हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरिवत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनि मी, या गोड आठवाने ॥१॥

बोलात बोबडीच्या संगीत जागविले
लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले
एकेक सूर यावा, न्हाऊन अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे ॥२॥

घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता, मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी, येथे फिरुनी येणे ॥३॥

गायक : पं. वसंतराव देशपांडे
गीतकार : शांताराम नांदगावकर
संगीत : अनिल - अरूण
चित्रपट : अष्टविनायक [१९७९]

४६. दोन घडीचा डाव

जानकी : दोन घडीचा डाव
त्याला जीवन ऐसें नाव ॥धृ.॥

जगताचें हें सुरेख अंगण
खेळ खेळुं या सारे आपण
खेळुं या, रंक आणखी राव ॥१॥

राम : माळ यशाची हांसत घालूं
हांसत हांसत तसेच झेलूं
झेलूं या, पराभवाचे घाव ॥२॥

दोघं : मनासारखा मिळे सौंगडी
खेळाला मग अवीट गोडी
दु:खाला नच वाव ॥३॥

गायक : अनंत मराठे
गीतकार : शांताराम आठवले
संगीतकार : केशवराव भोळे
चित्रपट : रामशास्त्री

३९. दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी

दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी
रानहरिणी, दे गडे भीती तुझी ॥धृ.॥

मोहगंधा पारिजाता रे सख्या
हांसशी कोमेजतां रीती तुझी ॥१॥

रे कळंका छेदितां तुज जीवनीं
सुस्वरे जन भारिते गीती तुझी ॥२॥

सोशितोसी झीज कैसी चंदना
अपकारितां उपकार ही नीती तुझी ॥३॥

गायिका :लता मंगेशकर
गीतकार :राजा बढे
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

२२. दत्त दिगंबर दैवत माझे

दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे ॥ धृ.॥

अनुसुयेचे सत्त्व आगळे
तिन्ही देवही झाली बाळे
त्रैमुर्ती अवतार मनोहर
दीनोद्धारक त्रिभुवनी साजे ॥ १ ॥

तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी, पायी खडावा
भस्म विलेपित कांती साजे ॥ २ ॥

पाहुनी प्रेमळ सुंदर मुर्ती
आनंदाचे अश्रू झरती
सारे सात्त्विक भाव उमलती
हळूहळू सरते मीपण माझे ॥ ३ ॥

गायक : आर्‌. एन्‌. पराडकर
गीतकार : कवी सुधांशु

२०. देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी

देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई ॥धृ.॥

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी ॥१॥

देव मुठीत ना मावे, तीथर्क्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही ॥२॥

देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण, निर्गुण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही ॥३॥

गीतकार : ग. दि. माडगुळकर
गायक :सुधीर फडके
संगीतकार : सुधीर फडके
चित्रपट : झाला महार पंढरीनाथ

Thursday, November 16, 2006

२. जीवलगा, कधी रे येशील तू

दिवसामागून दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जीवलगा, कधी रे येशील तू ॥धृ.॥

धरेस भिजवूनी गेल्या धारा
फुलून जाईचा सुके फुलोरा
नभ धरणीशी जोडून गेले सप्तरंग सेतू ॥१॥

शारद शोभा आली गेली
रजनीगंधा फुलली सुकली
चंद्रकलेसम वाढून विरले, अंतरीचे हेतू ॥२॥

हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरीरा दुबर्ल
पुन्हा वसंती डोलू लागे, प्रेमांकित केतू ॥३॥

पुनरपी ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभी पुनरपी आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू ॥४॥

गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :आशा भोसले
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :सुवासिनी - १९६१