Tuesday, December 24, 2013

२२२. ऐक पांडुरंगा साद लेकराची

२२२. ऐक पांडुरंगा साद लेकराची
भेट व्हावी देवा जीवाला जीवाची
तुच माऊली रे या तान्हुल्याची
ओढ लागली रे तुझ्या सावलीची ।।
विठ्ठला ... विठ्ठला ... दयासागर विठ्ठला ....
विठ्ठला ... विठ्ठला ... आले तुझ्या दारी ।।
तुझ्याविण नाही दाता कोणी
डोळीयात वाहे आज चंदभागा
धावत येई धावत येई ,
विठ्ठला ... विठ्ठला ... आले तुझे दारी ...
विठ्ठला ... विठ्ठला ... कृपासागर विठ्ठला ... ।।
जन्ममरणाचा इथे लपंडाव
नको रखु घाव संचिताचा
माऊलीत जाणे दु:ख माऊलीची
वर देई आम्हा अमृताचा
आमुच्या जीवनी तुच संजीवनी
तुच भेटवावे मायलेकरासी
द्वार उघड रे तुझ्या कृपेचे
शपथ घालते तुला लेकराची ।।
तुझाविना नाही त्राता कोणी
डोळियात वाहे आज चंदभागा ।। 
 
रचना - प्रविण दवणे
संगीत - अनिल मोहिले
स्वर - लता मंगेशकर  
चित्रपट - शुभमंगल सावधान [२००६]

Monday, December 1, 2008

२२२. अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू

२२२. अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥

चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥

तो सावळा सुंदरू कासे पितांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥

बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥

बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥


रचना - संत ज्ञानेश्वर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर

Friday, April 18, 2008

२२१. घन तमीं शुक्र बघ राज्य करी

२२१. घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !

ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी

प्रसवे अवस सुवर्णा अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?

फूल हसे काट्यांत बघ कसे
काळ्या ढगि बघ तेज रसरसे
तीव्र हिमांतुनि वसंतहि हसे
रे, उघड नयन, कळ पळे दुरी

फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?

मना, वृथा का भीती मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी

गीत :भा. रा. तांबे
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : लता मंगेशकर

Monday, December 3, 2007

२२०. भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन

२२०. भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ॥धृ.॥

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण ! ॥१॥

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
कळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून ॥२॥

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रिती ती खरी जी जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न ॥३॥

गीत : प्रल्हाद केशव अत्रे
संगीत : वसंत देसाई
स्वर : आशा भोसले
चित्रपट : श्यामची आई (१९५३)

Thursday, November 29, 2007

२१९. घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात

२१९. घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात ! ॥धृ.॥

"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं ! ॥१॥

विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं. ॥२॥

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो. ॥३॥

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार ! ॥४॥

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ? ॥५॥

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !" ॥६॥

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला ! ॥७॥

गीत : कृ. ब. निकुंब
संगीत : कमलाकर भागवत
स्वर : सुमन कल्याणपूर

२१८. राधा ही बावरी

२१८. रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते,
ऎकून तान, विसरून भान ही वाट कुणाची बघते,
त्या सप्त्सुरांच्या लाटेवरूनी साद ऎकूनी होई,
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ॥ धॄ॥

हिरव्या (२) झाडांची, पिवळी पाने झुलताना,
चिंब (२) देहावरूनी, श्रावणधारा झरताना,
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई,
हा उनाड वारा गूज प्रितीचे कानी सांगून जाई,
त्या सप्त्सुरांच्या लाटेवरूनी साद ऎकूनी होई,
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ॥ १॥

आज इथे या तरूतळी, सूर वेणूचे खुणावती,
तुज सामोरे जाताना उगा पाऊले घुटमळती,
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई,
हा चंद्र चांदणे ढगाआडूनी प्रेम तयांचे पाही,
त्या सप्त्सुरांच्या लाटेवरूनी साद ऎकूनी होई,
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ॥ २॥

गीत : अशोक पत्की
संगीत : अशोक पत्की
स्वर : स्वप्नील बांदोडकर
अल्बम : बेधुंद

२१७. सुरत पियाकी छिन्‌ विसराये

२१७. सुरत पियाकी छिन्‌ विसराये
हर हरदम उनकी याद आये ॥धृ.॥

नैनन और न को समाये
तरपत हूं बिलखत रैन निभाये
अखियाँ निर असुबन झर लाये ॥१॥

साजन बिन मोहे कछुना सुहाये
इस बिगरी को कौन बनाये
हसनरंग असु जी बहलाये ॥२॥

गीत : पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर : पं. वसंतराव देशपांडे
नाटक : कट्यार काळजात घुसली (१९६७)

२१६. कंठातच रुतल्या ताना, कुठे ग बाई कान्हा

२१६. कंठातच रुतल्या ताना, कुठे ग बाई कान्हा
कुणीतरी जा, जा, जा, जा, घेउनि या मोहना ॥धृ.॥

कदंब-फांद्यावरी बांधिला, पुष्पपल्लव-गंधित झोला
कसा झुलावा, परि हा निष्चल, कुंजविहारीविना ॥१॥

थांबे सळसळ जशि वृक्षांची, कुजबुज सरली झणि पक्ष्यांची
ओळखिचे स्वर कानि न येता, थबके ही यमुना ॥२॥

मुरलीधर तो नसता जवळी, सप्तस्वरांची मैफल कुठली ?
रासक्रिडेची स्वप्ने विरली, एका कृष्णाविना ॥३॥

गीत : गंगाधर महांबरे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : आशा भोसले

२१५. माझिया प्रियाला, प्रीत कळेना

२१५. माझिया प्रियाला, प्रीत कळेना
अनुराग त्याचा माझा, हाय रे जुळेना ॥धृ.॥

पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महीना
आवरू मनाला कैसे, मला ते जमेना
मुकी नेत्रभाषा त्याला, कळूनी वळेना ॥१॥

यौवनात सुकते काया, दुःख आवरेना
वेदना उरीची छेडी मुक्या भावनांना
स्पर्श गोड अजुनी त्याचा, सुखाचा मिळेना ॥२॥

वसंतात नाही बोले, श्रावणात नाही
कठोरास माझ्या मनिचे, कळेनाच काही
रात रात शिणती डोळे, पापणी ढळेना ॥३॥

गीत : उमाकांत काणेकर
संगीत : श्रीकांत ठाकरे
स्वर : शोभा गुर्टू

२१४. सजणा पुन्हा स्मरशील ना

२१४. सजणा पुन्हा स्मरशील ना
साऱ्या खुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना ! ॥धृ.॥

चकवून कुणा आले कोण
दिधले प्रिया चुंबनदान
कोणी कुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना ! ॥१॥

प्रीतीतले लाख बहाणे
तू मी नवे खेळ पुराणे
मनमोहना, सजणा पुन्हा स्मरशील ना ! ॥२॥

गीत : सुधीर मोघे
संगीत : श्रीधर फडके
स्वर : रंजना जोगळेकर

२१३. आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ॥धृ.॥

२१३. आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ॥धृ.॥

जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने यावे ॥१॥

विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळवा, हाती हात धरावे ॥२॥

सोडुनिया घर, नाती-गोती
निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे ॥३॥

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : सुधीर फडके
स्वर : आशा भोसले
चित्रपट : मुंबईचा जावई (१९७०)

२१२. मन पिसाट माझे अडले रे,

२१२. मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा ! ॥धृ.॥

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा ! ॥१॥

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा ! ॥२॥

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा ! ॥३॥

गीत : ना. घ. देशपांडे
संगीत : यशवंत देव
स्वर : कृष्णा कल्ले

२११. सख्या रे, किती रंगला खेळ !

२११. इथेच आणी या बांधावर
अशीच श्यामल वेळ
सख्या रे, किती रंगला खेळ ! ॥धृ.॥

शांत धरित्री शांत सरोवर
पवन झुळझुळे शीतल सुंदर
अबोल अस्फुट दोन जिवांचा
अवचित जमला मेळ ॥१॥

रातराणिचा गंध दर्वळे
धुंद काहिसे आतुन उसळे
चंद्र हासला, लवली खाली
नक्षत्रांची वेल ॥२॥

पहाटच्या त्या दवात भिजुनी
विरली हळुहळु सुंदर रजनी
स्वप्नसुमावर अजुनि तरंगे
ती सोन्याची वेळ ॥३॥

गीत : सुधांशु
संगीत : विठ्ठल शिंदे
स्वर : माणिक वर्मा

Wednesday, October 31, 2007

२१०. उगवला चंद्र पुनवेचा !

२१०. उगवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयी दरिया ! उसळला प्रीतिचा ! ॥धृ.॥

दाहि दिशा कशा खुलल्या,
वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या !
प्रणयरस हा चहुकडे ! वितळला स्वर्गिचा ? ॥१॥

गीत : प्रल्हाद केशव अत्रे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : बकुळ पंडित
नाटक : पाणिग्रहण (१९४६)

२०९. उठा उठा चिऊताई

२०९. उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे कसे मिटलेले
अजूनही अजूनही ! ॥धृ.॥

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ! ॥२॥

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ! ॥२॥

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ! ॥३॥

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिआ दूर जाई
भूर भूर भूर भूर ! ॥४॥

गीत : कुसुमाग्रज
संगीत : कमलाकर भागवत
स्वर : सुमन कल्याणपूर

२०८. मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला ॥धृ.॥

२०८. मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला ॥धृ.॥

नका विचारू स्वारि कशी ?
दिसे कशी, अन्‌ हासे कशी ?
कसं पाडलं मला फशी ?
कशी जाहले राजिखुशी ?
नजीक येता मुहूर्तवेळा ॥१॥

नका विचारू गमतीजमती
काय बोललो पहिल्या भेटी ?
कसे रंगले स्वप्न पहाटी ?
कशी रंगली लाली ओठी ?
कसा जाहला जीव खुळा ? ॥२॥

अर्थ उलगडे समरसतेचा
सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा
धुंद बने बुल्बूल जिवाचा
घरी यायची झाली वेळा ॥३॥

गीत : मनमोहन नातू
संगीत : गजाननराव वाटवे
स्वर : सरोज वेलिंगकर

२०७. पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची

२०७. पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू आशी घडे ही या दोन लोचनांची ॥धृ.॥

पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न रहिले मी, किमया अशी कुणाची ? ॥१॥

डोळे मिटून घेता दिसतोस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन्‌ नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याहि भावनांची ॥२॥

लाजून वाजती या अंगातुनी सतारी
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्ने ही मीलनाची ॥३॥

वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यांत वाचतो अन्‌ या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची ॥४॥

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : सुमन कल्याणपूर, अरुण दाते

२०६.जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !

२०६.जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे ! ॥धृ.॥

किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे ॥१॥

गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे ॥२॥

निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी ?
तूच एकला नाथ अनाथा महिमा तव गाजे ॥३॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले

Wednesday, October 24, 2007

२०५. मृगनयना रसिक मोहिनी ।

२०५. मृगनयना रसिक मोहिनी ।
कामिनी होती ती मंजूळ मधुरालापिनी ।
नवयौवनसंपन्न रम्य गतिविलासिनी ॥१॥

आल्हादक मुखचंद्रहि होता ।
होती दृष्टि ती प्रेम-रस-वाहिनी ॥२॥

गीत : गोविंद बल्लाळ देवल
संगीत : गोविंद बल्लाळ देवल
स्वर : पं. वसंतराव देशपांडे
नाटक : संगीत संशयकल्लोळ [१९१६]

Wednesday, October 10, 2007

२०४. मना तुझें मनोगत मला कधीं कळेल का

२०४. मना तुझें मनोगत मला कधीं कळेल का
तुझ्यापरी गूढ सोपें होणें मला जुळेल का ॥धृ.॥

कोण जाणे केवढा तूं
व्यापतोस आकाशाला
आकाशाचा अर्थ देसी
एका मातीच्या कणाला
तुझें दार माझ्यासाठी थोडेतरी खुलेले का ॥१॥

कळींतला ओला श्वास
पाषाणाचा थंड स्पर्श
तुझ्यामधें सामावला
वारा, काळोख, प्रकाश
तुझें अरुपाचें रूप माझ्यापुढें फुलेल का ॥२॥

कशासाठीं कासाविशी
कुणासाठीं आटापिटी
खुळ्या ध्यास-आभासांचा
पाठलाग कोणासाठीं
तुझ्या मनांतले आर्त माझ्यामनी ढळेल का ॥३॥

गीत : सुधीर मोघे
संगीत : आनंद मोडक
स्वर : आशा भोसले
चित्रपट : कळत नकळत [१९८९]