Thursday, June 28, 2007

११७. एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख

११७. एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ धृ. ॥

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ १ ॥

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणासी?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ २ ॥

एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाह्ताना, चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक ॥ ३ ॥

गीत : ग. दि. माडगुळकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : आशा भोसले
चित्रपट : सुखाचे सोबती [१९५८]

११६. हे बंध रेशमाचे

११६. पथ जात धर्म किंवा नाते ही ज्या न ठावे,
ते जाणतात एक,प्रेमास प्रेम द्यावे;
हृदयात जागणार्‍या अतिगूढ संभ्रमाचे,
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥१॥

विसरून जाय जेव्हा माणूस माणसाला,
जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाळा,
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमांचे.
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥२॥

क्षण एक पेटणारे हे युद्धवेड आहे
देहाहुनी निराळी रक्तास ओढ आहे
तीर्थाहुनी निराळे पावित्र्य संगमाचे
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥३॥

हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा,
धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा,
बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे.
तुटतील ना कधीही,हे बंध रेशमाचे. ॥४॥

गीत : शांता शेळके
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक : हे बंध रेशमाचे [१९६८]

११५. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा

११५. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा ॥धृ.॥

सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान
सा, नि, ध, प, म, ग, रे, सा, रे, ग, म, प
दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा ! ससा म्हणाला, चहा हवा ॥१॥

कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, छान छान ! ससा म्हणाला, काढ पान ॥२॥

कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे
(बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ)
आणि भरभर वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाबास ! ससा म्हणाला, करा पास ॥३॥

गीत : राजा मंगळवेढेकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : शमा खळे

११४. चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावानी

११४. चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावानी ॥धृ.॥

शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी, दिवसातरी मग कोठे निजसी ॥१॥

वारा वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिसी ॥२॥

काठी देखील नसते हाथी, थोडी नाही विश्रांती
चढती कैसी, कशी उतरसी निळ्या डोंगरी अखंड फिरशी ॥३॥

वाडा घरकुल घरटे नाही, आई नाही अंगाई
म्हणूनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी ॥४॥

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : आशा भोसले
चित्रपट : जिव्हाळा [१९६८]

११३. स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा

११३. स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा ॥धृ.॥

रेखाकृती सुखाच्या, चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरुन गेल्या
कधी सोशिला उन्हाळा कधी लाभला विसावा ॥१॥

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजूनी, प्रीती फुलोनी यावी
काट्याविना न हाती, केव्हा गुलाब यावा ॥२॥

सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा ॥३॥

गीत : म. पां. भावे
संगीत : अनिल । अरूण
स्वर : आशा भोसले

११२. हे चांदणे फुलांनी, शिंपीत रात्र आली

११२. हे चांदणे फुलांनी, शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी, ओल्या दवांत न्हाली ॥धृ.॥

तारे निळे नभांत, हे गूज सांगतात
का रंग वेगळा हा, खुलत्या नव्या कळीत
ओठांतल्या स्वरांना, का जाग आज आली ॥१॥

तो स्पर्श चंदनाचा, की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला, स्वप्नातल्या स्वरांचा
ही रात्र धूंद होती, स्वप्नात दंगलेली ॥२॥

वाटे हळूच यावा करपाश या गळ्यात
मैफिल ही सरावी ही धुंद त्या मिठीत
आनंद आगळा हा ही जाग आज आली ॥३॥

गीत : मधुसूदन कालेलकर
संगीत : प्रभाकर जोग
स्वर : अनुराधा पौडवाल
चित्रपट : चांदणे शिंपीत जाशी [१९८२]

१११. माझिया मना जरा थांब ना

१११. माझिया मना जरा थांब ना
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना!!! ॥धृ.॥

माझिया मना, जरा बोल ना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू!
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना!! ॥१॥

माझिया मना, जरा ऐक ना
सांजवेळ ही, तुझे चालणे!
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
उषःकाल आहे नवी कल्पना!! ॥२॥

गीत : सौमित्र
संगीत : श्रीधर फडके
स्वर : आशा भोसले