Monday, July 16, 2007

१७५. अ आ आई, म म मका

१७५. अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका ॥धृ.॥

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा ॥१॥

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन्‌ हसा ॥२॥

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई ॥३॥

गीतकार : मधुसूदन कालेलकर
संगीतकार : राम कदम
गायक : मन्ना डे
चित्रपट :एक धागा सुखाचा [१९६०]

१७४. अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव

१७४. अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव ॥धृ.॥

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले
आता दे परि सारे सरले, उरलं मागं नाव ॥१॥

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता, धरती दे गं ठाव ॥२॥

गीतकार : शांता शेळके
संगीतकार :आनंदघन
गायक :लता मंगेशकर
चित्रपट :मराठा तितुका मेळवावा [१९६४]

१७३. अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी:

१७३. अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी:
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती ॥धृ.॥

इथे सुरु होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती ॥१॥

सर्व बंध तोडुनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती ॥२॥

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी ॥३॥

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती ॥४॥

गीतकार : मंगेश पाडगावकर
संगीतकार :यशवंत देव
गायक :अरूण दाते

१७२. अगा करुणाकरा करितसे धांवा ।

१७२. अगा करुणाकरा करितसे धांवा ।
या मज सोडवा लवकरी ॥१॥

ऐकोनियां माझी करुणेची वचने ।
व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥

मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।
ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥

उशीर तो आतां न पाहिजे केला ।
अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥

उरलें तें एक हेंचि मज आतां ।
अवघें विचारितां शून्य झालें ॥५॥

तुका म्हणे आतां करीं कृपा दान
पाउलें समान दावीं डोळा ॥६॥

गीतकार : संत तुकाराम
संगीतकार :श्रीनिवास खळे
गायक :लता मंगेशकर

१७१. अजब सोहळा ! अजब सोहळा !

१७१. अजब सोहळा ! अजब सोहळा !
माती भिडली आभाळा ! ॥धृ.॥

मुकी मायबाई
तिला राग नाही
तुडवून पायी तिचा केला चोळामोळा ॥१॥

किती काळ साहील ?
किती मूक राहील ?
वादळली माती करी वा-याचा हिंदोळा ! ॥२॥

कुणी पाय देता
चढे धूळ माथा
माणसा रे, आता बघ उघडून डोळा ! ॥३॥

मातीची धरती
देह मातीचा वरती
माती जागवू दे मातीचा जिव्हाळा ! ॥४॥

गीतकार : शांता शेळके
संगीतकार : भास्कर चंदावरकर
गायक : रवींद्र साठे
चित्रपट : गारंबीचा बापू [१९८०]

१७०. अजि सोनियाचा दिनु ।

१७०. अजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्यभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजीत वनमाळी ॥३॥

बरवा संत समागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरु ।
बाप रखमादेविवरु ॥५॥

गीतकार : संत ज्ञानेश्वर
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : लता मंगेशकर

१६९. अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना

१६९. अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! ॥१॥

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ! ॥२॥

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ॥३॥

गीतकार : आ. रा. देशपांडे
संगीतकार :कुमार गंधर्व
गायक :कुमार गंधर्व
(हे गीत कवीने आपल्या पत्नीच्या दु:खद निधन प्रसंगी लिहीले आहे.)