१८७. जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले ॥धृ.॥
चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली
काजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली
मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले ॥१॥
सौख्य माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या भावना
मोर स्वप्नांचे निळे अन् विंधणाऱ्या वेदना
मी असे गीतांतुनी सर्वस्व माझे वाहिले ॥२॥
संपता पूजा स्वरांची हात तू देशील का ?
दाटुनी काळोख येता तू घरी नेशील का ?
पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले ॥३॥
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : लता मंगेशकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment