Thursday, November 30, 2006

६९.शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातुनी

६९.शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा ॥धृ.॥

मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा ॥१॥

लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा ॥२॥

शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा ॥३॥

गीतकार : मंगेश पाडगावकर
संगीतकार : श्रीनिवास खळे
गायक : सुधा मल्होत्रा, अरूण दाते

No comments: