Thursday, November 16, 2006

२. जीवलगा, कधी रे येशील तू

दिवसामागून दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जीवलगा, कधी रे येशील तू ॥धृ.॥

धरेस भिजवूनी गेल्या धारा
फुलून जाईचा सुके फुलोरा
नभ धरणीशी जोडून गेले सप्तरंग सेतू ॥१॥

शारद शोभा आली गेली
रजनीगंधा फुलली सुकली
चंद्रकलेसम वाढून विरले, अंतरीचे हेतू ॥२॥

हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरीरा दुबर्ल
पुन्हा वसंती डोलू लागे, प्रेमांकित केतू ॥३॥

पुनरपी ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभी पुनरपी आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू ॥४॥

गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :आशा भोसले
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :सुवासिनी - १९६१

2 comments:

Vinayak Gore said...

vaa! chhan gani det aahat. atyant upayukt blog aahe tumcha. thanks

avinashG said...

हेमंतीची नुरली हिरवळ " चा अर्थ कुणी सांगेल का ?