आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी ॥धृ.॥
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल टाकतो
सांगते अजूनही तुला परोपरी ॥१॥
सांग श्याम सुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी ॥२॥
त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदुंग मंजिर्यात वाजला
हाय वाजली फिरुन तीच बासरी ॥३॥
गायिका :लता मंगेशकर
गीतकार :सुरेश भट
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment