भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी ॥धृ.॥
राजा वदला मला समजली, शब्दावाचून भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा
का राणीच्या डोळा तेव्हा दाटूनी आले पाणी ॥१॥
राणी वदली बघत एकटक, दूरदूरचा तारा
उद्या पहाटे, दुसरा वाहता, दुज्या गावचा वारा
पण राजाला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी ॥२॥
तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे
का दैवाने फुलण्याआधी, फुल असे तोडावे
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी ॥३॥
का राणीने मिटले डोळे, दूरदूर जाताना
का राजाचा श्वास कोंडला, गीत तिचे गाताना
वार्यावरती विरुन गेली, एक उदास विराणी ॥४॥
गीतकार :मंगेश पाडगांवकर
गायक :अरुण दाते
संगीतकार :यशवंत देव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment