प्रेम स्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावुं तूज आतां मी कोणत्या उपायीं ? ॥१॥
तूं माय, लेकरूं मी, तूं गाय, वासरूं मी,
ताटातुटी जहाली आतां कसें करूं मी ? ॥२॥
गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा,
अन् राहिला कधींचा तान्हा तिचा भुका ना? ॥३॥
तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरिहि वाहे -
जाया सती शिरे जी आगींत, शांत राहे, ॥४॥
नैष्ठुर्य त्या सतीचें तूं दाविलेंस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचें सामीप्य साधण्यातें ॥५॥
नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्तीं आई, तरीहि जाची ॥६॥
चित्तीं तुझी स्मरेना कांहींच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका ॥७॥
विद्याधनप्रतिष्ठा: लाभे अतां मला ही
आईविणें परी मी हा पोरकाच राहीं ॥८॥
सारें मिळे परंतु आई पुन्हां न भेटे,
तेणें चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे ॥९॥
आई तुझ्या वियोगें ब्रम्हांड आठवे गे
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगें ॥१०॥
किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोतीं
अव्यक्त अश्रुधारा कीं तीर्थरूप ओती ॥११॥
गायक : गजाननराव वाटवे
गीतकार : माधव जुलियन
संगीत : जी. एन्. जोशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment