बुगडि माझी, सांडलि ग, जातां साताऱ्याला
चुगलि नगा, सांगु ग, माझ्या म्हाताऱ्याला ॥धृ.॥
माझ्या शेजारीं तरूण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधिं खुणेनें जवळ बाहतो
कधिं नाही तें भुललें ग बाई, त्याच्या इशाऱ्याला ॥१॥
आज अचानक घरी तो आला
पैरण फेटा नि पाठीस शेमला
किती गोड तो मजसी गमला
दिला बसाया पाट मी त्याला, माझ्या शेजाऱ्याला ॥२॥
घरांत नव्हते तेंव्हा बाबा
माझा मजवर कुठला ताबा
याची धिटाई तोबा तोबा
वितळू लागे ग लोणी बाई, बघतां निखाऱ्याला ॥३॥
त्यानें आणिली अपुली गाडी
तयार जुंपुनि खिलार जोडी
मीहि ल्यालें गं पिवळी साडी
वेड्यावाणी जोडीनें गं गेलों, आम्ही बाजाराला ॥४॥
येण्याआधीं बाबा परतून
पोंचणार मी घरांत जाउन
मग पुसतील काना पाहून
काय तेव्हां सांगू मी गं बाई, त्याला बिचाऱ्याला ॥५॥
गायिका : आशा भोसले
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीतकार : राम कदम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment